तृणमूलची फातोर्डात नवी खेळी : अकरा उमेदवारांची यादी जाहीर.आलेमाव कुटुंबातील दोघांची वर्णी
प्रतिनिधी /पणजी
एका मोठय़ा राजकीय घडामोडीत मंगळवारी तृणमूल पक्षाने खासदार लुईझिन फालेरो यांना फातोर्डामधून उमेदवारी जाहीर करून गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांच्यावर गुगली टाकली आहे.
तृणमूलच्या या राजकीय खेळीमुळे जबरदस्त हादरा बसलेले सरदेसाई आपला बालेकिल्ला राखण्यात कितपत यशस्वी होतात ते निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नुकतेच तृणमूलचे खासदार बनलेले फालेरो यांना पक्षाने पुन्हा एकदा स्थानिक निवडणुकीत उतरवून सरदेसाई यांना शह देण्याचे प्रयत्न केले आहेत. नावेली हा फालेरो यांचा घरचा मतदारसंघ असला तरी पक्षाने त्यांना तेथे उमेदवारी न देता सरदेसाईंच्या विरोधात फातोर्डातून उतरविले आहेत.
आलेमाव कुटुंबातील दोघांना उमेदवारी
या खेळीमुळे दक्षिण गोव्यातील राजकीय समिकरणे आता बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तृणमूल काँग्रेसने मंगळवारी आपल्या 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात प्रामुख्याने फालेरो (फातोर्डा) यांच्यासह आलेमाव कुटुंबातील चर्चिल (बाणावली) आणि वालंका (नावेली) यांचा समावेश आहे. तिसरे सर्वात महत्वाचे उमेदवार म्हणजे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष किरण कांदोळकर यांना हळदोणे मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे.
अन्य उमेदवारांमध्ये पर्वरीमधून संदीप वझरकर, कुंभारजुवेत समील वळवईकर, सांत आंद्रेत जगदीश भोबे, पर्येमधून गणपत गावकर, कुठ्ठाळीतून गिल्बर्ट रॉड्रिगीश, नुवेतून जोस काब्राल आणि कुंकळ्ळीमधून डॉ. जॉर्सन फर्नांडीस यांचा समावेश आहे.
बंगाली खासदार भाजपच्या मदतीसाठी : विजय
गोवा फॉरवर्ड नेते विजय सरदेसाई यांनी तृणमूल काँग्रेस व लुईझिन फालेरो यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजप आणि तृणमूल यांच्या दरम्यानचे साटेलोटे यामुळे उघडकीस आल्याचे ते म्हणाले. बंगालचे राज्यसभा सदस्य लुईझिन फालेरो हे फातोर्डा या गोव्यातील अत्यंत विकसित अशा मतदारसंघात कोणती विकासकामे राबवू इच्छितात हे जरा येथील जनतेला कळू द्या. फालेरो हे बंगालचे राज्यसभा सदस्य आहेत. नावेलीत त्यांची डाळ शिजत नाही हे त्यांच्या लक्षात आले म्हणून ते आता फातोडर्य़ात उतरले आहेत. ते स्वतः जिंकण्यासाठी राहिलेले नाहीत तर भाजपला जिंकून देण्यासाठी राहिलेले आहेत. तृणमूलतर्फे राहिल्यानंतर ख्रिस्ती व मुस्लिमांची मते आपल्याला मिळतील या स्वप्नात ते वावरत आहेत, असे ते म्हणाले.
बाहेरच्या लोकांना आपण घाबरत नाही
प्रशांत किशोर या आयपॅकच्या प्रमुखाने आपल्याला तृणमूलबरोबर या, अन्यथा तुम्हाला निवडणुकीत हरवू असा इशारा दिलेला आहे. गोव्याबाहेरील व्यक्तींच्या धमकींना आपण मुळीच घाबरत नाही. फातोडर्य़ातील नागरिक हुशार आहेत. भाजपला जिंकून देण्यासाठी भाजपवाले दरवर्षी कोणाला तरी मते फोडण्यासाठी उभे करतात. यावर्षी भाजपने कोणाला पुढे काढलेय हे उघड झालेले आहे, असे विजय सरदेसाई म्हणाले व फातोर्डा आम्हीच जिंकणार असेही त्यांनी पुढे सांगितले.