विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या सातारा शाखेने जागवला इतिहास
प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील शाहूपुरी परिसरात असलेल्या गेंडामाळ येथील फाशीचा वड येथील हुतात्मा स्मारकास विद्रोही सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी अभिवादन करुन देशासाठी हुतात्मा झालेल्या 17 हुतात्म्यांच्या बलिदानास सलाम केला.
या घटनेविषयी आठवणी जागवताना ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके त्याच्या इतिहासाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, फाशीचा वड येथील हुतात्मा स्मारक परिसरात दि. 8 सप्टेंबर 1857 रोजी इंग्रजांच्या कंपनी सरकारने 17 जणांना राजद्रोहाच्या आरोपाखाली दोषी सर्वजणांना देहदंडाची शिक्षा देण्यात आली व त्यांची सर्व संपत्ती सरकार जमा करण्यात आली.
विशेष म्हणजे या खटल्यात सरकारने 17 साक्षीदार तपासले. देहदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी तीन प्रकारे करण्यात आली. 5 जणांना फासावर लटकवण्याची शिक्षा सुनावली. 6 जणांना बंदुकीच्या गोळ्यांनी मारण्याची शिक्षा सुनावली तर 6 जणांना तोफेच्या तोंडी देण्याची शिक्षा झाली. या खटल्याचा निकाल दि. 7 सप्टेबर 1857 रोजी देण्यात आला आणि शिक्षेची अंमलबजावणी 8 सप्टेंबर 1857 रोजी सातारा जवळील गेंडामाळ येथील फाशीचा वड येथे करण्यात आली होती.
त्या हुतात्म्यांना सातारा विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे सातारा जिल्हा शाखेच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे विजय मांडके, प्रा. गौतम काटकर, अमित कांबळे, रोहित क्षीरसागर, संकेत माने, विनित चव्हाण, शुभम ढाले तसेच परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीचे मिनाज सय्यद, जयंत उथळे उपस्थित होते.