मुंबई/प्रतिनिधी
शिवसेनेचे लाकसभेतले गटनेते विनायक राऊत यांनी पेगॅसस प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. फोन टॅपिंग प्रकरणाची जेपीसीकडून चौकशी करा, अशी लोकसभा अध्यक्षांकडे लेखी मागणी शिवसेना करणार आहे. दरम्यान, पेगासस स्पायवेअरद्वारे झालेल्या फोन टॅपिंगवरून शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. या प्रकरणाची जेपीसीद्वारे (संयुक्त संसदीय समिती) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवेसेनेने केली आहे.
शिवसेनेचे नेते, खासदार विनायक राऊत यांनी ही माहिती दिली. आम्ही फोन टॅपिंग प्रकरणाची जेपीसी मार्फत चौकशीची लेखी मागणी लोकसभा अध्यक्षांना करणार आहोत. काल संबंधित मंत्र्यांनी खुलासा केला असला तरी तो योग्य नव्हता, असं विनायक राऊत यांनी सांगितलं. तसेच आज लोकसभेत इंधन दरवाढ आणि वाढती महागाई यावर प्राधान्याने चर्चा व्हावी ही मागणी शिवसेनेनं केली आहे. कोरोनावरील चर्चेला पंतप्रधानांनी सभागृहला उत्तर द्यावे ही अपेक्षा शिवसेनेची आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अन्य एक मंत्री, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर, माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा आदींनाही ‘पेगॅसस’द्वारे लक्ष्य करण्यात आल्याची शक्यता माध्यमांनी वर्तवली आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने हा विषय चांगलाच तापला असून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आजही सभागृहात हा मुद्दा गाजणार असल्याचे संकेत विनायक राऊत यांनी दिले आहेत.