ऍमेझॉनसोबतचा वाद : किशोर बियानी,अनिल बियानी यांच्यावरही निर्बंध लागू
वृत्तसंस्था / मुंबई
मागील काही दिवसांपासून फ्यूचर समूह, ऍमेझॉन आणि रिलायन्स याच्या संदर्भात विविध प्रकारच्या घडामोडी होत असल्याचे पहावयास मिळत आहे. तसेच फ्यूचर समूहाच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. विशेषतः फ्यूचर समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर बियानी यांना भविष्यकाळात अधिकच संकटांना तोंड द्यावे लागणार असे दिसून येते.
ऍमेझॉनसोबत सुरु असणाऱया विवादामध्ये मार्केट रेग्युलेटर सेबीने फ्यूचरवर इनसाइडर ट्रेडिंगचे आरोप लावले आहेत. यासोबत किशोर बियानी, अनिल बियानी अन्य यांच्यावर सिक्युरिटी मार्केट नियमानुसार एक वर्षापेक्षा अधिकचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
समूहाकडून स्पष्टीकरण
सेबीने किशोर बियानी, काही संबंधीत युनिट्स आणि अन्य तिघांवर फ्यूचर रिटेलचे ट्रेडिंग करण्यास दोन वर्षांसाठी बंदी घातली आहे. त्यामुळे किशोर बियानी फ्यूचर रिटेल समभाग खरेदी आणि विक्री करु शकणार नाहीत. परंतु यावर समूहाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार सेबीच्या या ऑर्डरचा फ्यूचर रिटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीज याच्या व्यवहारावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
इन्साइडर ट्रेडिंगची चौकशी
या फ्युचरच्या काही लोकांना विशिष्ट प्रकारे प्रशिक्षित करण्यात आले होते, असे सेबीच्या तपासात आढळून आले आहे. या लोकांनी 10 मार्च 2017 ते 20 एप्रिल 2017 च्या दरम्यान अनपब्लिश्ड प्राईस सेंसिटिव्ह इन्फॉर्मेशन (युपीएसआय) च्या आधारावर ट्रेडिंग केले आहे. तसेच अन्य काही नियमबाहय़ व्यवहारही केल्याचे तपासणीत स्पष्ट झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. फ्युचरने याचा इन्कार केला.
फ्यूचरवर लोअर सर्किट
उपलब्ध माहितीनुसार गुरूवारी सकाळी फ्यूचर समूहातील सर्व कंपन्यांच्या समभागांची मोठय़ा प्रमाणात विप्री झाल्याने लोअर सर्किट लागले. यामध्ये फ्यूचर एटरप्राईजेस, फ्यूचर रिटेल, फ्यूचर लाईफस्टाईल फॅशन्स, फ्यूचर सप्लाई चेन सोल्युशन्सचा समावेश आहे.