अबुधाबी
भारत, क्रोएशिया आणि ग्रीसनंतर आता संयुक्त अरब अमिरात (युएई) हा देश फ्रान्सकडून लढाऊ विमाने खरेदी करणार असल्याचे सांगण्यात येते. सुमारे 80 राफेल विमाने खरेदी केली जाणार असल्याचे समजते, ज्यासाठी युएईला 16 अब्ज युरो इतकी रक्कम मोजावी लागणार आहे. फ्रान्सने या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही. युएई आपल्या ताफ्यात लढाऊ विमाने सामील करून आपले संरक्षण दल अधिक भक्कम करू पाहात आहे. कतार व युएई यांच्यात अलीकडे धुसफूस दिसून येते. कतारकडे आधीपासून 24 राफेल लढाऊ विमाने ताफ्यात आहेत. युएईची हवाई ताकद नव्याने विमानांच्या समावेशानंतर अर्थातच वाढणार आहे. ही बाब कतारसाठी नक्कीच अडचणी वाढवणारी ठरणार आहे, हे वेगळे सांगायला नको. फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयाने हा निर्यातीच्या तुलनेतला सर्वात मोठा शस्त्र व्यवहार असल्याचे म्हटले आहे.