ऑनलाईन टीम / पॅरिस :
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रो यांनी कोरोनाविरोधातील पहिली लढाई जिंकल्याचा दावा करत लॉकडाऊनचे निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे आजपासून फ्रान्समध्ये उद्योग, व्यवसाय, हॉटेल, रेस्टॉरंट, बारवर कोणतेही निर्बंध नसतील.
मॅक्रो यांनी रविवारी रात्री उशिरा यासंदर्भात घोषणा केली. फ्रान्सने एक महिन्यापूर्वी आठ आठवड्यांचा लॉकडाऊन मागे घेतला होता. त्यानंतर महिनाभरात कोरोना रुग्णांची संख्या फारसी वाढली नाही. त्यामुळे देशातील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय फ्रान्सने घेतला आहे. मयोटी आणि गुयाना हे भाग वगळता सर्व भागातील निर्बंध उठवण्यात आले आहेत. पॅरिसमध्ये सर्व कॅफे आणि रेस्टॉरंट सुरू करण्यात येणार आहेत. एका आठवड्यात शाळा, महाविद्यालये आणि नर्सरीदेखील सुरू करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी सोशल डिस्टन्स पाळणे आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करताना मास्क घालणे सक्तीचे असणार आहे.
तसेच आता युरोपीयन देशांमध्ये प्रवास करण्यास परवानगी आहे. एक जुलैनंतर कोरोनावर मात केलेल्या युरोपबाहेरील देशांमध्ये प्रवास करण्याची मुभा असेल, असेही मॅक्रो यांनी सांगितले.