डिचोली, फोंडा, पणजी पोलिसांचे संयुक्त यश : लुटेऱयांपैकी तिघांना अटक : अन्य दोघांना पडकण्यासाठी पथक रवाना
- अवघ्या काही तासांतच प्रकरणाचा छडा
- मंगळवारी अपहरण व लुटीची घटना
- आमोणेहून व्यवस्थापकाचे अपहरण
- मध्यरात्री कॅशियरला बोलावले
- लुटीनंतर व्यवस्थापकाला पुन्हा फिरविले
प्रतिनिधी / पणजी
केरी सत्तरी येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेचे व्यवस्थापक लिखित सुनिल पांचनेकर यांचे अपहरण करून बँक लूट प्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. एकूण पाच संशयितांपैकी दोन संशयित फरार असून त्यांचा शोध जारी आहे. अटक केलेल्या संशयितांकडून सुमारे 50 लाख रुपये किमंतीचे 1 किलो 100 ग्रॅम सोन्यासह 4 लाख 49 हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच चाकू, एअर गन व कारही जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग यांनी दिली.
पोलीस मुख्यालयात काल गुरुवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ओमवीर सिंग बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबीत सक्सेना, पणजी एसडीपीओ सुदेश नाईक, फोंडा एसडीपीओ सी. एल. पाटील व डिचोली एसडीपीओ सागर एकोस्कर व अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.
अटक केलेल्या संशयितांमध्ये साहिल खान उर्फ नियाज (हा केरी येथील बँकेच्या शेजारीच राहत होता), राजू कुमार व जितेंद्र कुमार या बिगरगोमंतकीय युवकांचा समोवेश आहे. राजू कुमार हा गोव्याबाहेर पळण्याच्या तयारीत असतानाच त्याला रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली.
मंगळवारी अपहरण व लुटीची घटना
मंगळवार 13 सप्टेंबर रोजी रात्री हे लुटीचे प्रकरण झाले हेते. 14 रोजी तक्रार नोंद होताच अवघ्या काही तासातच पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. या प्रकरणात तपासकाम करणाऱया सर्व पोलीस कर्मचाऱयांचे पोलीस महासंचालकांनी अभिनंदन केले असून त्यांना विशेष बक्षिसही देण्यात येणार असल्याचे सिंग यांनी सांगितले.
आमोणेहून व्यवस्थापकाचे अपहरण
बँक व्यवस्थापक लिखित पांचनेकर मूळ मुंबईतील असून सध्या करंजाळे येथे राहतात. मंगळवार 13 रोजी ते बँकेतील काम संपवून रात्री 8 च्या सुमारास एमएच-03-एपी-9023 क्रमांकाच्या दुचाकीवरून करंजाळे येथे जात होते. आमोणे येथील सातेरी शांतादुर्गा मदिराजवळ निर्जनस्थळी त्यांना संशयितांनी अडविले आणि जीए-01-आर-7724 क्रमांकाच्या कारमध्ये घातले. बंदुक आणि चाकूचा धाक दाखविला तसेच सांगितलेले काम न केल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिली.
मध्यरात्री कॅशियरला बोलावले
व्यवस्थापकाला रात्रभर विविध ठिकाणी फिरविण्यात आले तसेच मानसिक छळ करण्यात आला. मध्यरात्रीच्या सुमारास केरी येथील बँकेच्या ठिकाणी घेऊन गेले. नंतर फोन करून पॅशियरला बोलवायला लावले. त्याच्याकडील एक चावी घ्यायला लावली. पॅशियरला घरी पाठविल्यानंतर दोन्ही चाव्यांच्या सहाय्याने बँकेतील सोने तसेच सुमारे 8 लाख 74 हजार रुपये रोख रक्कम संशियितांनी लुटली.
बँक लुटल्यानंतर व्यवस्थापकाला पुन्हा फिरविले
व्यवस्थापकाला तसेच गाडीत घालून पुन्हा फिरविले आणि ओल्ड गोवा येथील निर्जनस्थळी फेकले आणि संशयितांनी पोबारा केला. संपूर्ण रात्रभर उपाशी असल्याने भूकेने व्याकूळ झालेल्या व्यवस्थापकाला काहीच सुचत नव्हते. तोपर्यंत बुधवार उजाडला होता. त्यांनी तशाच स्थितीत पणजी पोलिसस्थानक गाठले आणि घडलेली घटना सांगितले.
अवघ्या काही तासांतच प्रकरणाचा छडा
सुरुवातीला ही घटाना फिल्मी असल्यासारखी वाटत होती, मात्र व्यवस्थापकाला डिचोली पोलीस स्थानकात नेऊन डिचोली पोलिसांनी अज्ञात संशयितांच्या विरोधात भादंसं 341, 364 (ए), 365, 380, 397, 506 (2) तसेच शस्त्र कायदा कलम 3 व 27 खाली गुन्हा नोंद करण्यात आला. प्राथमिक तपास केला असता प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात आले आणि आयजीपीसह अधीक्षक, उपअधीक्षक मिळून सर्वजण तपासकामाला लागले आणि अवघ्या काही तासातच प्रकरणाचा छडा लावण्यात यशस्वी झाले.
दिवसरात्र असे घडले तपासकाम
व्यवस्थापकाने दिलेल्या माहितीनुसार प्रकरण डिचोली पोलीस स्थानकाच्या हद्दीत येत असल्याने त्याला त्वरित डिचोली पोलीस स्थानकात नेण्यात आले व तक्रार नोंद करून घेतली. तीन एसडीपीओ आणि एक अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण आठ टिम्स तयार करण्यात आल्या. सर्वांना तपासकामाला लावण्यात आले. 14 रोजी संपूर्ण रात्रभर पोलीस संशयितांचा तपास करीत होते. बँक लुटत असताना लुटेऱयांनी तोंडाला मास्क लावला होता. त्यामुळे त्यांची सहज ओळख पटणे कठीण होते. मात्र सीसी टीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची पुसटशी ओळख मिळाली. त्यानुसार स्थानिक लोकांची मदत घेऊन संशयित कोण, याची खात्री पटताच सुरुवातीला जितेंद्र कुमार याला कुर्टी-फोंडा येथून अटक केली. त्यानंतर त्याला सोबत घेऊन पोलीस रात्रभर फिरले आणि इतर दोघांना अटक केली व मुद्देमाल जप्त केला. अन्य दोघे संशयित गोव्याबाहेर गेल्याचे समजताच त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथक पाठविण्यात आले आहे.
प्रत्येक बँकेतील शाखेत बंदुकधारी सुरक्षारक्षक तैनात करावे असे आवाहन पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग यांनी केले आहे. काही शाखांमध्ये सुरक्षारक्षक तैनात केले जातात मात्र अधिकाधिक सुरक्षारक्षक बँकेच्या आत झोपत असतात असे आढळून आले असून त्याबाबत संबंधितांनी दक्षता घ्यावी, असेही ओमवीर सिंग यांनी सुचविले आहे.