अन्यथा आंदोलन करण्याचा शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांचा इशारा
पावसाळ्यात ग्राहकांचे रांगेत उभे राहण्यासाठी हाल,
दोडामार्ग – वार्ताहर-
दोडामार्ग शहरातील राष्ट्रीयकृत बँकांनी आपापल्या शाखांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे अन्यथा शाखा व्यवस्थापकां विरुद्ध आंदोलन करण्यात येईल . तहसीलदारांनी देखील संबधित बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांना योग्य ती समज द्यावी अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी केली आहे.
धुरी यांनी सांगितले की, दोडामार्ग शहरातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये अनेक आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी अनेकांची ये जा चालू असते. बाजारपेठेतील व्यापारी, नागरिक यांच्यासोबत अन्य गावांतील ग्रामस्थ, महिला यासुद्धा बँकांमध्ये येतात. सध्या सर्वत्र सुरू असलेले कोरोनाचे संकट लक्षात घेता. व्यापारी असो किव्हा नागरिक प्रत्येकजण आपापल्या परीने सोशल डिस्टनसिंग तसेच अन्य पद्धतीने काळजी घेत आहेत. मात्र या बँकांच्या शाखांमध्ये गर्दीचे टाळण्यासाठीचे नियोजन केल्याचे दिसत नाही.
सध्या पाऊस असल्याने बँक शाखेच्या बाहेर कोणताही दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने एकत्रित रित्या अनेकजण उभे राहतात. त्यासाठी बँक व्यवस्थापनाने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. परंतु दुर्दैवाने तसे होताना आढळत नाही. या गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव होऊ शकतो हे बहुधा या बँकांच्या शाखाधिकाऱ्यांना माहिती नसावे असे धुरी म्हणाले.
या बँकांमध्ये येणाऱ्या आपल्या ग्राहकांची योग्य ती काळजी व सोय, व गर्दीचे व्यवस्थापन बँकेच्या प्रशासनाने कोणालाही वेठीस न धरता करावे बँकेत येणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना जर त्रास झाला तर त्याला संबधित बँकेच्या शाखाधिकारी जबाबदार धरण्यात येतील व अशा विरुद्ध आंदोलनाचा पवित्र घ्यावा लागेल. तहसीलदारांनी देखील याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असून संबधित बँकांना त्यांनी योग्य त्या सूचना कराव्यात अशी मागणी बाबुराव धुरी यांनी केली आहे.