मतदानपूर्व सर्वेक्षणाचे अनुमान : केरळमध्ये पुन्हा लाल झेंडा फडकणार : तामिळनाडूत स्टॅलिनची जादू
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पश्चिम बंगालसह 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. याचदरम्यान एबीपी न्यूज-सी व्होटरच्या नव्या मतदानपूर्व सर्वेक्षणातून 5 राज्यांमधील राजकीय चित्राचे आकलन करण्याचा प्रयत्न झाला आहे. या सर्वेक्षणानुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेवर येण्याची दाट शक्यता आहे, पण तृणमूलच्या जागा मात्र घटणार आहेत. आसाममध्ये भाजप पुन्हा सरकार स्थापन करू शकतो. पुदुच्चेरीत भाजप पहिल्यांदाच सत्तास्थानी पोहोचू शकतो. सर्वेक्षणानुसार तामिळनाडूत यंदा सत्तांतराची चिन्हे आहेत. केरळमध्ये पुन्हा डावी आघाडी सरकार स्थापन करू शकते.
बंगालमध्ये दीदींची जादू कायम
सर्वेक्षणानुसार पश्<िचम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विजयाची हॅटट्रिक करू शकतात. 294 जागा असलेल्या विधानसभेत तृणमूलला 148 ते 164 जागा मिळू शकतात. मागील वेळी 3 जागा जिंकणाऱया भाजपला जबरदस्त लाभ होताना दिसत असला तरीही सत्तेवर येण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. भाजपला 92 ते 108 जागा मिळू शकतात. तर डावे-काँग्रेस आघाडीला 31-39 जागा प्राप्त होऊ शकतात. तृणमूलला 43 टक्के, भाजपला 38 टक्के आणि डावे-काँग्रेस आघाडीला 13 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी ममतांना पसंती
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून सर्वेक्षणात सामील 56 टक्के लोकांनी ममतांना पसंती दर्शविली आहे. तर 25 टक्के लोकांनी भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या नावाला पसंती दिली आहे. 9 टक्के लोक मुकुल रॉय यांना मुख्यमंत्री पाहू इच्छितात. तर 2 टक्के लोकांनी सुवेंदु यांना पसंती दर्शविली आहे.
आसाममध्ये पुन्हा भाजप सरकार
सर्वेक्षणानुसार 126 विधानसभा जागा असलेल्या आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपचे सरकार येऊ शकते. पक्षाला 68-76 जागा मिळू शकतात. काँग्रेस आघाडीला 43-51 तर इतरांच्या वाटय़ाला 5-10 जागा मिळू शकतात. राज्यात भाजपला 42 टक्के, काँग्रेस आघाडीला 31 टक्के तर इतरांना 27 टक्के मते मिळू शकतात. आसाममध्ये सध्या भाजपचे सर्वानंद सोनोवाल मुख्यमंत्री आहेत.
तामिळनाडूत स्टॅलिन सरकार?
सर्वेक्षणानुसार तामिळनाडूत यंदा सत्तांतर घडू शकते. तेथे अण्णाद्रमुक-भाजप आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडूच्या निवडणुकीत अण्णाद्रमुक-भाजप आघाडीला 58-66 जागांवर समाधान मानावे लागू शकते. द्रमुक-काँग्रेस आघाडीला 154-162 जागा मिळू शकतात. तर इतरांच्या वाटय़ाला 8-20 जागा मिळण्याचा अनुमान आहे. अण्णाद्रमुक-भाजप आघाडीला 29 टक्के, द्रमुक-काँग्रेस आघाडीला 41 तर इतरांना 30 टक्के मते मिळू शकतात.
केरळमध्ये डावे सत्ता राखणार
केरळमध्ये डावे पक्ष स्वतःचा बालेकिल्ला वाचविण्यास यशस्वी ठरू शकतात. 140 सदस्यीय केरळ विधानसभेत डाव्या आघाडीला सत्ता राखण्यास यश मिळू शकते. सर्वेक्षणानुसार एलडीएफला 83-91 जागा, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफला 47-55 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 0-2 जागा मिळण्याचा अनुमान आहे. इतरांना 0-2 जागा मिळू शकतात.
पुदुच्चेरीत राजकीय चमत्कार पुदुच्चेरीत भाजप पहिल्यांदाच सत्तेवर येण्याची शक्यता आहे. 30 सदस्यीय विधानसभेत भाजपला 17-21 जागा मिळू शकतात. काँग्रेसला 8-12 जागांवर समाधान मानावे लागू शकते. भाजपला 46 टक्के, काँग्रेसला 36 तर इतरांच्या वाटय़ाला 18 टक्के मते येऊ शकतात.