वृत्तसंस्था/ कोलकाता
देशातील कोरोना व्हायरस संकटामुळे सध्या लॉकडाऊनचा कालावधी सुरू आहे. कोरोना परिस्थितीमध्ये सुधारणा झाल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात येणाऱया प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सरावाआधी क्रिकेटपटूंची नेत्रतपासणी केली जाणार असल्याची माहिती बंगाल क्रिकेट संघटनेच्या प्रवक्त्याने दिली. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये वरिष्ठ आणि 23 वर्षांखालील वयोगटाच्या संघांची नेत्रतपासणी पहिल्यांदाच बंगाल क्रिकेट संघटनेतर्फे घेतली जाणार आहे.
बंगाल क्रिकेट संघटनेचे शासकीय अधिकारी आणि बंगालच्या प्रशिक्षक वर्गाची यासंदर्भात चर्चा झाल्यानंतर वरील निर्णय घेण्यात आला. कोरोना महामारी संकटामुळे जवळपास चार महिन्यांच्या कालावधीत क्रिकेटपटूंना क्रिकेटपासून अलिप्त रहावे लागत असल्याने त्यांच्या डोळय़ावर परिणाम होवू शकतो. क्रिकेटमध्ये नजर आणि जलद हालचाली या दोन गोष्टींना विशेष महत्त्व असते हे ध्यानात घेत बंगाल क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक अरूण लाल यांनी क्रिकेटपटूंसाठी नेत्र चांचणी सक्तीची करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे क्रिकेटपटूच्या डोळय़ांच्या समस्येबाबत संघटनेला माहिती होईल आण्णि त्यानुसार उपायही करता येतील, असे बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अविषेक दालमिया यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
बंगालचा क्रिकेटपटू दीपदास गुप्ता याने नवोदित यष्टीरक्षकांसाठी सुरू केलेल्या क्लिनिकमध्ये नेत्र चांचणीसाठी केली जाणार आहे. कोरोना परिस्थितीमध्ये सुधारणा झाल्यानंतर सात ते 10 दिवसांसाठी फिरकी गोलंदाजांसाठी शिबीर बंगाल क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित केले जाणार आहे. बऱयाचवेळा संबंधीत व्यक्तीला कल्पना नसतानाही डोळय़ामध्ये दोष निर्माण होवू शकतो. त्यामुळे त्याच्या नजरेत बिघाड होवू शकतो. राज्यातील वरिष्ठ आणि 23 वर्षांखालील वयोगटाच्या संघातील क्रिकेटपटूंना नेत्र चांचणी सक्तीची केली आहे. लवकरच 19 वर्षांखालील क्रिकेटपटूंनाही नेत्र चांचणीसाठी सक्ती केली जाईल अशी माहिती बंगाल क्रिकेट संघटनेचे क्रिकेट ऑपरेशन विभागाचे व्यवस्थापक जॉयदीप मुखर्जी यांनी दिली. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या नियमावलीनुसार क्रिकेटपटूंसाठी सराव आणि प्रशिक्षण शिबिरे सुरू केली जातील, असेही दालमिया यांनी सांगितले. आगामी सराव शिबिरासाठी बंगाल क्रिकेट संघटनेतर्फे पहिल्यांदा 30 संभाव्य क्रिकेटपटूंची निवड केली जाईल.