उचगाव / प्रतिनिधी
सरनोबतवाडी ता. करवीर येथील उजळाई कॉलनी येथे बंद घराचा लोखंडी व लाकडी दरवाज्याचे कुलूप तोडून घरातील कपाटातून रोख रक्कम ऐंशी हजार रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख २५ हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.
सरनोबतवाडी येथील रियाज शौकत शेख (वय ३५) यांचे उजळाई कॉलनी प्लॉट नंबर ३ येथे राहते घर आहे. शेख यांची आई विक्रमनगर येथे राहते. तीन महिने आई आजारी असल्याने शेख हे विक्रम नगर येथे ये-जा करत होते.मंगळवारी ते विक्रमनगर येथे राहिले. बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी शेख यांच्या बंद घराचे लोखंडी व लाकडी दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील असणाऱ्या कपाटा मधील रोख ८० हजार तसेच अर्धा तोळ्याचे सोन्याचे टॉप्स, अर्ध्या तोळ्याची अंगठी, अर्ध्या तोळ्याचे सोन्याचे गंठण असा एकूण एक लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. शेजाऱ्यांनी बुधवारी सकाळी त्यांना चोरीची घटना कळवली.
यावेळी गांधीनगर पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले.चोरीच्या ठिकाणी ठसे तज्ञ आणि श्वानपथकास पाचारण करण्यात आले. मात्र श्वान घटनास्थळीच घुटमळले. या चोरीची घर मालक रियाज शौकत शेख यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली . याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात करीत आहेत.