मुंबई
पेटीएम आणि ऍमेझॉन प्रमाणेच बजाज फायनान्सने आता प्रीपेड पेमेंट बिझनेस करण्याचा विचार चालविला आहे. सदरच्या प्रस्तावाला रिझर्व्ह बँकेने मंजुरी दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनी लवकरच बजाज पे योजनेचा प्रारंभ करणार आहे.
आताच्या घडीला ऑनलाइन पेमेंट करण्यावर अनेकांचा भर दिसतो आहे. ऑनलाइन खरेदी असो किंवा अन्य पैशाच्या देवाणघेवाणीच्या व्यवहारात आता मोबाइलचा वापर सर्रास होत आहे. ऑनलाइन पेमेंटच्या स्पर्धेत उतरण्यात गुगल पे, पेटीएम आणि ऍमेझॉन पे यांचा समावेश असून यांच्याप्रमाणेच बजाज आपला नवा व्यवसाय आगामी काळात करणार आहे. बजाज फायनान्सला वॉलेट ठेवण्यासाठी आरबीआयने मंजुरी दिली आहे. त्यामुळे कंपनीला आता दरवर्षी आरबीआयची मंजुरी घेण्याची गरज उरणार नाही. बजाज पे अंतर्गत ग्राहकांना देवाण-घेवाणीचे व्यवहार सहजपणे करता येणार आहेत. यासाठीच ही योजना अत्यंत अनुकूल करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सदरची योजना कधी सुरू होणार आहे, याबाबत मात्र कंपनीने स्पष्टता दिलेली नाही.