एपीएमसीमधील घटना : चोरटय़ाला केले पोलिसांच्या स्वाधीन
वार्ताहर / कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाटे पोती चोरी करणाऱया चोरटय़ाला पकडून त्याला जमावाने चांगलाच चोप दिल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यानंतर त्या चोरटय़ाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
शुक्रवारी बेळगाव एपीएमसी परिसरातील भाजी विक्रेत्या महिलांनी नेहमीप्रमाणे भाजी खरेदी करून आपल्या वाहनामध्ये ठेवले. त्यानंतर त्या पुन्हा दुसरी भाजी खरेदी करण्यासाठी एका दुकानामध्ये गेल्या. हीच संधी साधून सदर चोरटय़ाने त्या वाहनातील बटाटय़ाचे पोते घेऊन तो आपल्या ऍक्टिवा दुचाकीवर ठेवून घेऊन जात होता. त्यावेळी ही घटना सदर महिलांच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरड करताच तेथे उपस्थित असलेल्या युवकांनी त्या चोरटय़ाचा पाठलाग केला. त्याला एपीएमसीच्या प्रवेशद्वारातच पकडून चांगलाच चोप देण्यात आला. त्यानंतर त्या चोरटय़ाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत रात्री उशिरा पोलीस स्थानकाकडे चौकशी केली असता चोरटय़ाची अद्याप चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
अशा घटना वारंवार एपीएमसी आवारात घडत आहेत. याचा बंदोबस्त पोलीस अधिकारी आणि एपीएमसी प्रशासनाने करावा, अशी मागणी व्यापारी वर्गातून करण्यात येत आहे.