कोल्ड स्टोअरेजमधील तारण असलेल्या बेदाण्याची विल्हेवाट, आठ जणांवर गुन्हा
प्रतिनिधी/मिरज
कोल्ड स्टोअरेजसाठी घेतलेल्या कर्जापोटी तारण ठेवलेल्या बेदाण्याची परस्पर विक्री करुन बडोदा बँकेच्या मिरज शाखेची 16 कोटी, 97 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी कोल्ड स्टोअरेजच्या संचालकांसह आठ शेतकऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 2017 पासून हा प्रकार सुरू होता. एवढी मोठी फसवणूक होऊनही तीन वर्षात उघडकीस कशी आली नाही? याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये निरुपमा पेडूरकर (रा. मुंबई), अजित नारायण जाधव (रा. हसनी आश्रमजवळ, सांगली), प्रद्युम्न बाळगोंडा पाटील (रा. वसगडे), राहूल गणेश मित्तल, मिरा दिनेश मित्तल (दोघे रा. माधवनगर, बायपास रोड) दीपक मधुकर गुरव (कवठेएकंद), गणेश सोपान पवार (तानंग), प्रशांत प्रकाश निकम (तासगांव) यांचा समावेश आहे.
मिरज-तासगांव रस्त्यावर सिएनएक्स कॉर्पोरेशन लि. मुंबई या कंपनीचे कोल्ड स्टोअरेज आहे. या कोल्ड स्टोअरेजसाठी बडोदा बँकेच्या मिरज शाखेकडून मोठे कर्ज काढण्यात आले होते. त्यासाठी बँकेबरोबर करार करुन कोल्ड स्टोअरेजमधील बेदाणा तारण ठेवण्यात आला होता. मात्र, सदर कोल्ड स्टोअरेजमधील बेदाणा हा बँकेकडे तारण असताना संबंधीत आठ संशयीतांनी बँकेची कोणतीही परवानगी न घेता, त्याची विक्री केली. एकूण 16 कोटी, 97 लाख रुपयांची फसवणूक या प्रकरणात झाली असल्याची फिर्याद बँकेचे मिरज शाखा व्यवस्थापक जगदिश नामदेवराव पाटील यांनी मिरज शहर पोलिसात दिली आहे. 2017 पासून हा प्रकार सुरू असूनही आणि कोटय़ावधी रुपयांची फसवणूक होऊनही अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.