प्रतिनिधी / सातारा :
सातारा येथील शेटे चौकातील एका सराफाची पंधरा हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी नालासोपारा (मुंबई) येथील एका महिलेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शीतल सतीश गौड असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव असून, रात्री उशिरापर्यंत तिला अटक झालेली नव्हती.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, श्रीकांत प्रमोद टंकसाळे (वय 26, रा. दिव्यनगरी, शाहूपुरी, सातारा) यांचे गुरुवार पेठेतील शेटे चौकात शुभम ज्वेलर्स नावाची सोन्याची पेढी आहे. रविवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शीतल सतीश गौड (वय 32, रा. नालासोपारा, मुंबई) ही महिला त्यांच्या पेढीवर आली आणि तिने माझा मुलगा आजारी आहे, असे सांगून 5.120 ग्रॅम वजनाची पिवळ्या धातूची फुले गहाण ठेवली आणि त्या बदल्यात पंधरा हजार रुपये घेवून गेली. मात्र, नंतर ही फुले खोटी असल्याची लक्षात आल्यानंतर श्रीकांत टंकसाळे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात शीतल गौड हिच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर तिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ए. के. जगताप करत आहेत.