प्रतिनिधी / कराड
कोळेवाडी ता. कराड येथे 95 हजाराच्या बनावट नोटा व पिस्तूल जप्त करत तीन संशयितांना अटक केली होती. या प्रकरणात आणखी दोघांचा सहभाग आढळून आला असून पोलिसांनी मंगळवारी नगर जिल्ह्यातील आरडगाव येथून दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेने कोळेवाडी येथे तीन संशयितांना गत आठवड्यात ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून 94 हजार 500 रूपयांच्या बनावट नोटा व गावटी पिस्टल हस्तगत केले. या प्रकरणाचा तपास करताना तालुका पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ यांनी स्वता संशयितांकडे चौकशी करत त्यांची साखळी शोधण्याचा प्रयत्न केला. यामधे बाबासो गुलाब जाधव (वय 42) व रितेश बाबासो जाधव ( वय 23, दोघेही रा. आरडगाव, ता. राहुरी, जि. नगर) यांचा सहभाग आढळून आल्यावर त्यांना अटक केली.
त्यांच्याकडून बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर व स्कॅनर असे साहित्य जप्त केले आहे. दरम्यान त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील, पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर, पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, हवलदार सपकाळ, हवलदार अमोल पवार, आशिष पाटील यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी प्रयत्न केले.