महिलेच्या मानेवर सुरा ठेवून सव्वा लाखाचा ऐवज लंपास, व्याजवाडीतील घटना
प्रतिनिधी/ वाई
महिलेच्या गळय़ाला सुरा लावून बलात्काराची धमकी देत गळयातील सोन्याचे मंगळसूत्र, वेल आणि कानातील फुले व 34 मन्यांची सोन्याची माळ असा सुमारे दोन तोळे सोन्याच्या एक लाखाचा ऐवज व तेराशे रुपये रोख चार-पाच अज्ञात चोरटय़ांनी लांबवले. तालुक्यातील चोऱयांचे अमानुष सत्र पुन्हा सुरू होवून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कडेगाव ते व्याजवाडी जाणाऱया रस्त्यावर राजेंद्र दादासा चव्हाण (वय 35) यांच्या मालकीचे रस्त्यालगतच घर असून ते शेळी पालनाचा व्यवसाय करतात. दि. 24 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास राजेंद्र चव्हाण हे दुसऱयाच्या शेतात बकरी बसविण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून जात होते. त्यामुळे बकऱयाच्या सोबत त्यांचाही मुक्काम दुसऱयाच्या शेतामध्ये होत होता. त्यांची पत्नी सौ. अश्विनी चव्हाण व मुलगा जयराज चव्हाण (वय 8), मुलगी प्रिया चव्हाण (वय 6) तसेच 65 वर्षांची आई हे घरामध्ये रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी असतात. याची माहिती अज्ञात चोरटय़ांनी काढलेली असावी. व बायका माणसे घरात एकटे असल्याची काणकून त्यांना लागल्याने या चार ते पाच अज्ञात चोरटय़ांनी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास सहा फूट लांबीच्या गजाचा वापर करून तो गज खिडकीच्या जाळीतून आतून कडी लावलेल्या दारापर्यंत नेवून हात चलाखीने ती बंद दाराची कडी काढून घरामध्ये चार ते पाच अज्ञात चोरटय़ांनी प्रवेश केला. त्यावेळी स्वयंपाक घरामध्ये झोपलेल्या अश्विनी चव्हाण (वय 28) यांना झोपलेल्या अवस्थेतच या चोरटय़ांनी आपल्या जवळील सुरा काढून थेट मानेवर ठेवला आणि त्यांच्या गळयातील सोन्याचे मणी मंगळसूत्र, कानातील फुले, वेल अशा वस्तू जबरदस्तीने काढून घेतल्या आणि त्यांना मारहाण करून बलात्कार करण्याची धमकी देत सोने व रोख रक्कमेची मागणी केली.
स्वयंपाक घरातून या चोरटय़ांनी पुन्हा आपला मोर्चा प्रवेशव्दार असलेल्या खोलीकडे वळवला. त्या ठिकाणी फिर्यादीची सासू लिलाबाई जयसिंग चव्हाण (वय 60) वर्षे यांनाही सुऱयाचा धाक दाखवित त्यांच्या गळयातील 34 सोन्याचे मनी असणारी माळ हिसकावून घेतली. दरम्यान, चोरटय़ांनी सुमारे एक तास घरातील चिजवस्तू तपासत सोने व रोख रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार तक्रारदार व लहान मुले भयभित होवून उघडय़ा डोळयांनी पहात होते. त्यावेळी लहान मुले जय व प्रिया यांनी आरडाओरडा केल्याने त्यांच्या आईला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व पोबारा केला. जाता एक मोबाईलही चोरून नेला आहे. या घरात चोरी करण्यापूर्वी त्यांनी परिसरातील दोन घरे देखील फोडण्याचा प्रयत्न केला. पण त्या घरातील माणसे जागी झाल्याने तो प्रयत्न अयशस्वी ठरला. याबाबतची तक्रार अश्विनी चव्हाण यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याचे अधिकारी व एलसीबीचे पथक घटनास्थळावर दाखल झाले होते. अचानक झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक तपास वाई पोलीस करीत आहेत.