प्रतिनिधी / करमाळा
बलात्कारप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या मनोहरमामा भोसलेचा जामीन बार्शी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी दि. 30 रोजी फेटाळला आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीमध्ये दोन्ही बाजूंचा युक्तीवाद झाला होता. मात्र न्यायालयाने यावर निर्णय दिला नव्हता. या युक्तीवादावर न्यायालयान निकाल दिला असून यामध्ये भोसलेचा जामीन फेटाळण्यात आला आहे.
महिलेवरील बलात्काराच्या गुन्ह्यात मनोहर भोसले सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्यावर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. पोलिस कोठडी संपल्यानंतर करमाळा न्यायालयाने भोसलेला न्यायालयीन कोठडी दिली होती. यामध्ये भोसलेला जामीन मिळावा, असा अर्ज भोसलेच्यावतीने अॅड. गायकवाड यांनी केला होता.
शनिवारी बार्शी येथे न्यायालयात सुनावणी झाली. शुक्रवारी न्यायाधीशांसमोर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांच्यासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूच्या युक्तीवादावर निर्णय देत त्यांनी जामीन अर्ज फेटाळला आहे.