कोरोनाची 17,10,207 जणांना लागण : आशियात 10 हजार 235 जणांचा मृत्यू : इराणमध्ये सर्वाधिक बळी
जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत 1,03,506 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 3 लाख 76 हजार जणांना संसर्गापासून मुक्तता मिळाली आहे. 200 पेक्षा अधिक देशांमध्ये 17 लाख 10 हजार 207 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील केवळ युरोपमध्येच 8 लाख 50 रुग्ण सापडले आहेत. तर तेथे सुमारे 70 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर आशियात 10 हजार 235 जणांचा बळी गेला आहे. आशियात इराणमध्ये सर्वाधिक 4 हजार लोक मारले गेले आहेत. टाळेबंदी संपुष्टात आणण्यात जगभरातील देशांनी घाई करू नये, टाळेबंदी हटविल्यास अधिक जणांचा मृत्यू होऊ शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
ट्रम्प यांचा निर्बंधांचा इशारा
कोरोना महामारीच्या दरम्यान स्वतःच्या नागरिकांना मायदेशी बोलाविण्यास नकार देणाऱया देशांवर नवे व्हिसा निर्बंध लादण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. कोरोना संकटात अमेरिकेतून स्वतःच्या नागरिकांना मायदेशी परतण्यास मान्यता न देणाऱया तसेच जाणूनबुजून विलंब करणाऱया देशांवर व्हिसा निर्बंध लादले जाणार आहेत. या देशांनी अमेरिकेच्या लोकांसाठी आरोग्यसंबंधी धोका वाढविला आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱया विदेशी नागरिकांचे प्रत्यार्पण करण्यास अमेरिका सक्षम असल्याचे ट्रम्प म्हणाले.
इटलीत 570 जणांचा मृत्यू
इटलीचे पंतप्रधान जूजेप्पे कॉन्टे यांनी देशातील टाळेबंदी 3 मेपर्यंत वाढविली आहे. तत्पूर्वी तेथे 9 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली होती. इटलीत कोरोनामुळे 24 तासांत 570 जणांचा मृत्यू झाला आहे. तर संसर्गाचे सुमारे 4 हजार नवे रुग्ण समोर आले आहेत. कोरोनामुळे इटलीत सर्वाधिक 18,849 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 1 लाख 47 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
फ्रान्समध्ये तीव्रता वाढली
फ्रान्समध्ये शुक्रवारी 987 जणांचा मृत्यू झाल्याने देशातील एकूण बळींचा आकडा आता 13,197 वर पोहोचला आहे. इटली, स्पेन आणि अमेरिकेनंतर फ्रान्समध्ये सर्वाधिक बळी गेले आहेत. फ्रान्समध्ये कोरोनाबाधितांची संख्या 1,24,869 झाली आहे. फ्रान्समध्ये मागील काही दिवसांत रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत आहे.
ब्रिटनमध्ये 19 आरोग्य कर्मचाऱयांचा मृत्यू
ब्रिटनमध्ये 73 हजार 758 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तेथे 8,958 जणांना जीव गमवावा लागला आहे. नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या 19 कर्मचाऱयांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांनी दिली आहे. दुःखाच्या या क्षणी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. कोरोनाच्या विरोधात लढणारे हे लोक असून यातील अनेक आरोग्य कर्मचारी अल्पसंख्याक समुहाचे होते असे हॅनकॉक म्हणाले. लिव्हरपूलच्या रुग्णालयात 102 वर्षीय महिलेने कोरोनावर मात केली आहे. ब्रिटनमध्ये सध्या प्रतिदिन सुमारे 19 हजार चाचण्या होत आहेत.
दक्षिण कोरियात नवे संकट
दक्षिण कोरियात कोरोनातून मुक्त झालेल्या 91 जणांची चाचणी पुन्हा पॉझिटिव्ह आली आहे. या लोकांना पुन्हा लागण कशी झाली याचा उलगडा होऊ शकलेला नाही. कदाचित या लोकांची चाचणी योग्यप्रकारे झाली नसावी असे काही तज्ञांचे म्हणणे आहे. दक्षिण कोरियात आतापर्यंत 208 जणांचा मृत्यू झाला असून 10 हजार 450 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
ब्राझीलमध्ये आठवडय़ात तीनपट बळी
ब्राझीलमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आठवडाभरात 3 पट झाली आहे. 3 एप्रिल रोजी बळींचा आकडा 359 होता. 10 एप्रिल रोजी तो 1074 झाला आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठानुसार देशात सध्या 19,789 रुग्ण सापडले आहेत. अध्यक्ष जायर बोल्सोनारो संसर्ग रोखण्याचे उपाय कायम ठेवण्यास सातत्याने नकार देत आहेत. देशाची आर्थिक स्थिती महामारीपेक्षा अधिक बिकट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी अनेक प्रांताच्या गव्हर्नरांकडून लागू करण्यात आलेल्या सेल्फ आयसोलेशनला हटविण्याची मागणी केली होती.
फिलिपाईन्सचा नवा निर्णय
फिलिपाईन्सने स्वतःच्या वैद्यकीय कर्मचाऱयांना दुसऱया देशांमध्ये काम करण्यास बंदी घातली आहे. डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय तंत्रज्ञ आणि अन्य कर्मचाऱयांना विदेशात काम करण्यास मनाई करण्यात आली आहे. देशात सध्या आणीबाणी लागू आहे. फिलिपाईन्स दरवर्षी 13 हजार वैद्यकीय कर्मचारी विदेशात पाठवतो. तर देशात 2 लाख 90 हजार आरोग्य कर्मचाऱयांची कमतरता भासत आहे. तेथे आतापर्यंत 4195 रुग्ण सापडले असून 221 जणांचा मृत्यू झाला आहे.
चीनमध्ये 46 नवे रुग्ण
चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशननुसार कोरोना संसर्गाचे 46 नवे रुग्ण सापडले असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 34 रुग्णांमध्ये लक्षणे दिसून आलेली नाहीत. तसेच चीनमधील एकूण रुग्णांची संख्या आता 81 हजार 953 झाली आहे. तर 3339 जणांनी जीव गमावला आहे.
तुर्कस्तान : 31 प्रांतांमध्ये संचारबंदी
तुर्कस्तानात कोरोना संकटावर मात करण्यासाठी शुक्रवार मध्यरात्रीपासून 31 प्रांतांमध्ये 48 तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनी याची घोषणा केली आहे. अंकारा, अदाना, आएदिन, बुरसा, इस्तंबूल, कोन्या, इरसुरुम यासारख्या शहरांचा यात समावेश आहे. देशात 47 हजारांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून 1006 जणांचा बळी गेला आहे. तर इस्तंबुल येथील 93 वर्षीय महिलेने कोरोनावर मात केली आहे.
अर्जेंटीना : 27 एप्रिलपर्यंत टाळेबंदी
अर्जेंटीनामध्ये कोरोनाबाधितांची संख्या 1975 झाली असून 82 जणांना जीव गमवावा लागला आहे. अध्यक्ष एल्बेतो फर्नांडिज यांनी देशाला संबोधित करत संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी 27 एप्रिलपर्यंत टाळेबंदी वाढविण्याची घोषणा केली आहे.
न्यूयॉर्कमध्ये 24 तासांत 777 बळी
अमेरिकेत 24 तासांमध्ये 2034 जणांना जीव गमवावा लागला असून 35 हजार 98 नवे रुग्ण सापडले आहेत. अमेरिकेत आतापर्यंत एकूण 18,761 जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वाधिक 5 लाख 03 हजार 177 रुग्ण अमेरिकेतील आहेत. तर न्यूयॉर्कने संसर्गाप्रकरणी सर्व देशांना मागे टाकले आहेत. तेथे आतापर्यंत 1 लाख 72 हजार 358 रुग्ण आढळले आहेत. प्रांतात 24 तासांत 777 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर बळींचा आकडा 7 हजार 844 झाला आहे. स्थिती सुरळीत होईपर्यंत निर्बंध शिथिल करण्यात येणार नसल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेत आतायर्पंत 20 लाखांपेक्षा अधिक जणांची चाचणी करण्यात आली आहे. देशात आता ब्लड बेस्ड सेरोलॉजी चाचणी सुरू केली जाणार आहे. या चाचणीद्वारे लोकांना संसर्ग झाला आहे की नाही तसेच त्यांची रोगप्रतिकारकक्षमता किती आहे याची माहिती मिळू शकेल.