ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी बसपाच्या सहा बंडखोर आमदारांनी आणि भाजपच्या एका आमदाराने पक्षप्रमुख अखिलेश यादव यांच्या उपस्थित सपामध्ये प्रवेश केला. उत्तरप्रदेशात सपा हा भाजपचा विरोधी पक्ष म्हणून उदयास येत असून, तो सातत्याने बळकट होताना दिसत आहे.
सुषमा पटेल (मुंग्रा बादशाहपूर, जौनपूर), हरगोविंद भार्गव (सिधौली, सीतापूर), अस्लम चौधरी (धौलाना, हापूर) अस्लम राइनी (श्रावस्ती), हकीम लाल बिंद, (हंडानिया, प्रयागराज), मुजतबा सिद्दीकी (प्रतापपूर प्रयागराज) आणि भाजपचे सीतापूरचे आमदार राकेश राठोड यांनी सपामध्ये प्रवेश केला.
आमदारांच्या पक्षप्रवेशावेळी अखिलेश यादव म्हणाले की, सपामध्ये सामील व्हायचे आहे असे बरेच लोक आहेत. निवडणुका संपेपर्यंत भाजप ‘धावते कुटुंब’ राहील. या निवडणुकीत भाजपची सफाई होणार आहे. भाजपकडून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही किंवा त्यांचे जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत. महागाई वाढत आहे. त्यामुळे सरकारबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे.