बसपास प्रक्रियेला गती : दररोज शेकडो पास तयार
प्रतिनिधी /बेळगाव
दरवषी शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली की विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करून दिले जायचे. मात्र मागील वर्षापासून बसपास प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसपास मिळण्यास उशीर होत आहे. मागील आठवडय़ापासून बसपास प्रक्रिया गतिमान झाली असून, 3 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना बसपास वितरीत करण्यात आले आहेत.
मागील दोन वर्षापासून शैक्षणिक वर्षाला उशिराने सुरुवात होते. त्यामुळे बसपास प्रक्रिया देखील उशिरा सुरू होत आहे. तसेच विद्यार्थ्यांना बसपास मिळविण्यासाठी सेवा सिंधू पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागत आहे. दरम्यान सर्व्हर डाऊन व इतर तांत्रिक समस्यांमुळे अर्ज दाखल करताना अडचणी निर्माण होत आहेत. जुन्या बसपासची मुदत 26 सप्टेंबरला संपली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचा पैसे मोजूनच प्रवास सुरू होता. आता शाळांना दसऱयाची सुट्टी आहे. या काळात विद्यार्थ्यांना बसपास मिळविण्याची संधी आहे. त्यामुळे संबंधित शाळातील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना बसपास मिळविण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
बसपास विभागात प्राथमिक, माध्यमिक, पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या बसपास वितरणाच्या कामाला जोर आला आहे. दुसऱया क्रमांकाच्या आगारामध्ये हे काम सुरू असून बसपास वितरण करणाऱया कर्मचाऱयांची संख्या देखील वाढविण्यात आली आहे. त्यामुळे दररोज शेकडो पास तयार होत आहेत. शाळेतील शिक्षक व इतर कर्मचाऱयांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी करून बसपास तयार केले जात आहेत. तयार झालेले बसपास संबंधित शाळेतील शिक्षक किंवा कर्मचाऱयांकडे सुपूर्द केले जात आहेत.