प्रतिनिधी / बेळगाव
शहरात विविध ठिकाणी सुरू असलेली स्मार्ट सिटीची कामे… अनेक ठिकाणी खोदलेले रस्ते… काही ठिकाणी अर्धवट स्थितीत असलेली कामे… वाढती वाहने यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या समोरील जुन्या पी. बी. रोडवर दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीतून बाहेर पडताना वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून सर्किट हाऊस ते जुन्या भाजी मार्केटकडे जाणाऱया जुन्या पी. बी. रोडवर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱया वाहनधारकांना या कोंडीचा सामना करावा लागत आहे. परिसरातील रस्त्यांचा स्मार्ट सिटीअंतर्गत विकास साधण्यात येत आहे. त्यामुळे सदर रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. परिणामी बसस्थानकाच्या समोरील रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढला आहे. शहरात येणाऱया वाहनांची ये-जादेखील या रस्त्यावरूनच होत आहे. खासगी रिक्षावालेदेखील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच थांबत आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
बसस्थानकात येणाऱया वाहनांची संख्या अधिक आहे. त्याबरोबरच राज्यांतर्गत बससेवा सुरू झाल्यामुळे बसेसची संख्याही वाढली आहे. त्यामुळे बसस्थानकाच्या समोर वाहतूक कोंडी नित्याची बाब ठरत आहे. याबरोबरच प्रवाशांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे या रस्त्यावर पादचाऱयांची संख्याही अधिक दिसून येत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे इतरत्र असलेल्या मार्गांचे काम तातडीने पूर्ण करून वाहतुकीसाठी खुले करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.