बेळगाव / प्रतिनिधी :
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील विविध भागाचा विकास साधण्यात येत असून मध्यवर्ती बसस्थानकातील भुयारी मार्गाचे कामही स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात ये आहे. मात्र लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यापासून हे काम अर्धवट स्थितीत बंद होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून या कामाला पुन्हा सुरूवात करण्यात आली आहे.
बसस्थानक परिसरातील पादचारी व प्रवाशांची गर्दी कमी करण्याच्या दृष्टीकोनातून मध्यवर्ती बसस्थानक व शहर (सीबीटी) बसस्थानक भुयारी मार्गाने जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे बसस्थानकाकडे जाणाऱया रस्त्यांवर बॅरीकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. मध्यवर्ती बसस्थानकात दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते, त्यामुळे सतत परिसरात नागरिक ये-जा करत असतात. त्यामुळे गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण होते. लहान वाहने व पादचारी, प्रवाशांना दोन्ही बसस्थानकडे ये-जा करणे सोयीस्कर व्हावे, यादृष्टीकोनातून हा भुयारी मार्ग जोडला जात आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करून मध्यवर्ती बसस्थानकात येणाऱया नागरिकांना भुयारी मार्गाने सीबीटीकडे जाणे सोयीस्कर होणार आहे. आधुनिक बसस्थानकाचे काम स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू आहे. त्यामुळे बसस्थानक आवारात तात्पुरत्या बस आगाराची निर्मिती करून बससेवा पुरविली जात असलीत तरी सध्या लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यापासून बस सेवा पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे परिवहन मंडळाला मोठा फटका बसत आहे.