प्रतिनिधी /बेळगाव
सीबीटी आणि मध्यवर्ती बसस्थानक जोडण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या भुयारी मार्गाचे काम पुन्हा हाती घेण्यात आले आहे. कोरोना आणि स्मार्ट बसस्थानकाच्या कामामुळे भुयारी मार्गाकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र, आता सीबीटी बसस्थानकाच्या कामाबरोबर भुयारी मार्गाच्या कामाला चालना मिळाली आहे.
बसस्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी भुयारी मार्ग उभारला जात आहे. त्यामुळे प्रवाशांना सीबीटी ते मध्यवर्ती बसस्थानक असे ये-जा करणे सोयीस्कर होणार आहे. मात्र, भुयारी मार्गाचे काम मागील काही दिवसांपासून रखडले होते. परिणामी खोदकाम केलेली माती परिसरातच पडून असल्याने वाहनधारकांना अडथळा निर्माण होत आहे. या कामाला आता पुन्हा जोमाने प्रारंभ झाला आहे. त्यामुळे लवकरच बसस्थानकाबरोबर भुयारी मार्ग उभा राहणार आहे.
लहान वाहने, प्रवासी आणि पादचाऱयांना दोन्ही बसस्थानकात ये-जा करणे सोयीस्कर होणार आहे. यासाठीच हा मार्ग जोडला जात आहे. सीबीटी बसस्थानकात भव्य पार्किंग व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे पार्किंगसाठी ये-जा करणाऱया वाहनधारकांनादेखील भुयारी मार्ग उपयोगी ठरणार आहे. एखाद्या प्रवाशाला सीबीटी बसस्थानकातून मध्यवर्ती बसस्थानकात जायचे असल्यास भुयारी मार्ग सोयीस्कर ठरणार आहे.