प्रतिनिधी/ खेड
मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूरनजीक गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास खेड-नालासोपारा बस आणि डम्पर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात डम्परचालक अनंत मोतीराम वाघमारे (40, भाले-माणगाव, रायगड) जागीच ठार झाला. या अपघातात बसचालकाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापती झाल्या असून बसमधील प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.
ठाणे आगाराची खेड-नालासोपारा ही बस (एमएच 20/बीआय 0903) गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास नालासोपाराला निघाली होती. बस इंदापूरनजीक आली असता समोरून येणाऱया डम्परचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघातात डम्परचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. बसचालकाच्या पायांना गंभीर दुखापती झाल्या असून त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. इंदापूर पोलीस व वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. याप्रकरणी इंदापूर पोलीस स्थानकात शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.