वृत्तसंस्था/ ढाका
यजमान बांगलादेशने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विंडीजवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. शुक्रवारी या मालिकेतील दुसऱया सामन्यात बांगलादेशने विंडीजचा 7 गडय़ांनी पराभव केला.
या दुसऱया सामन्यात विंडीजचा कर्णधार जेसन मोहम्मदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. विंडीजचा डाव 43.4 षटकात 148 धावांत आटोपला. त्यानंतर बांगलादेशने 33.2 षटकात 3 बाद 149 धावा जमवित हा सामना आणि मालिका जिंकली. मेहदी हसन मिराजला सामनावीरचा बहुमान मिळाला.
विंडीजच्या डावात एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकवता आले नाही. आर. पॉवेलने 66 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 41, ओटेलीने 44 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 24, बॉनेरने 25 चेंडूत 1 चौकारासह 20, जोसेफने 3 चौकारांसह 17, हुसेनने 17 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 12, कर्णधार जेसन मोहम्मदने 11 धावा जमविल्या. बांगलादेशच्या अचूक गोलंदाजीसमोर विंडीजचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद झाले. विंडीजच्या डावात 2 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे मेहदी हसन मिराजने 25 धावांत 4 तर मुस्तफिजूर रेहमान आणि शकीब अल हसन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. हसन मेहमूदने 1 बळी मिळविला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या डावात कर्णधार तमीम इक्बालने 76 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 50, लिटॉन दासने 24 चेंडूत 4 चौकारांसह 22, नजमूल हुसेनने 2 चौकारांसह 17, शकीब अल हसनने 50 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 43 तसेच मुश्फिकुर रहिमने नाबाद 9 धावा केल्या. 33.2 षटकात बांगलादेशने 3 बाद 149 धावा जमवित विंडीजवर या मालिकेत सलग दुसरा विजय मिळविला. विंडीजतर्फे अकिल हुसेन, जेसन मोहम्मद आणि रिफेर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना येत्या सोमवारी चित्तगाँगमध्ये खेळविला जाणार आहे.
संक्षिप्त धावफलक
विंडीज 43.4 षटकात सर्वबाद 148 (आर. पॉवेल 41, ओटेली 24, बॉनेर 20, जोसेफ 17, जेसन मोहम्मद 11, अकिल हुसेन नाबाद 12, मेहदी हसन मिराज 4/25, शकीब अल हसन 2/30, एम. रेहमान 2/15, हसन मेहमूद 1/54), बांगलादेश 33.2 षटकात 3 बाद 149 (तमीम इक्बाल 50, शकीब अल हसन नाबाद 43, लिटॉन दास 22, नजमूल हुसेन 17, एम. रहीम नाबाद 9, अकिल हुसेन, जेसन मोहम्मद आणि रिफेर प्रत्येकी 1 बळी).