हिंदूंची घरे अन् दुकानांची लूट
वृत्तसंस्था/ ढाका
शेजारी देशांमध्ये हिंदू आणि त्यांच्या मंदिरांवरील हल्ल्याच्या घटना अलिकडच्या काळात वाढल्या आहेत. पाकिस्तानात अलिकडेच गणेश मंदिरात तोडफोड करण्याच्या गंभीर घटनेनंतर आता बांगलादेशात कट्टरवाद्यांनी मंदिरांना लक्ष्य केले आहे.
येथील मशिदीसमोरून किर्तन करत मंदिराच्या दिशेने जाणाऱया भाविकांवर कट्टरवाद्यांनी हल्ला केला आहे. तसेच समाजकंटकांनी चार मंदिरांना लक्ष्य केले आहे. या चारही मंदिरांमधील देवतांच्या मूर्तींची विटंबना करण्यात आली आहे. याचबरोबर कट्टरवाद्यांनी हिंदूंची घरे तसेच दुकानांमध्ये शिरून लूट केली आहे.
बांगलादेशच्या खुलना जिल्हय़ातील रुपसामध्ये ही घटना घडली आहे. तेथील शियाली गावात कट्टरवाद्यांनी हिंदूधर्मीयांना लक्ष्य केले आहे. भाविक किर्तन करत महाश्मशान मंदिराच्या दिशेने जात असताना समाजकंटकांनी त्यांनी घेरून मारहाण सुरू केली. या घटनेनंतर कट्टरवाद्यांच्या मोठय़ा जमावाने महाश्मशान मंदिरात पोहोचून तोडफोड सुरू केली.
त्यानंतर कट्टरवाद्यांचा जमावा शियाली पुरबापारा येथे पोहोचला. तेथील हरि मंदिर, दुर्गा मंदिर आणि गोविंदा मंदिराला लक्ष्य करण्यात आले. 10 मूर्तींची जमावाने तोडफोड केली आहे. स्थिती आता नियंत्रणात असून अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. याप्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकारी सरदार मुशर्रफ हुसैन यांनी दिली आहे.