वृत्तसंस्था/ ढाक्का
पाक विरूद्ध होणाऱया तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी बांगलादेशच्या 15 जणांचा संघ जाहीर करण्यात आला असून सलामीचा फलंदाज तमीम इक्बालचे पुनरागमन झाले आहे.
उभय संघातील या मालिकेला 24 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. गेल्यावर्षी झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर तमीम इक्बालने आतापर्यंत एकही सामना खेळला नाही. बांगलादेश संघामध्ये 20 वर्षीय वेगवान गोलंदाज हसन मेहमूदचे पहिल्यांदाच आगमन झाले असून रूबेल हुसेनचे संघात पुनरागमन झाले. पाक आणि बांगलादेश यांच्यात टी-20 चे तीन सामने, दोन कसोटी आणि एकमेव वनडे सामना खेळविला जाणार आहे. हे सामने जानेवारी आणि एप्रिल दरम्यान होतील.
टी-20 मालिका 24 ते 27 जानेवारी, पहिली कसोटी 7 ते 11 फेब्रुवारी दरम्यान खेळविली जाईल. त्यानंतर बांगलादेशचा संघ काही कालावधीसाठी मायदेशी येणार आहे. एप्रिल महिन्यात बांगलादेश पुन्हा पाकमध्ये जाणार असून उभय संघात एकमेव वनडे सामना 3 एप्रिलला तसेच दुसरी कसोटी 5 ते 9 एप्रिल दरम्यान खेळविली जाईल.
बांगलादेश संघ- मेहमूदुल्ला (कर्णधार), तमीम इक्बाल, सौम्या सरकार, नईम शेख, नजिमुल हुसेन, लिटॉन दास, मोहम्मद मिथुन, ए हुसेन, एम. हसन, उमीनूल इस्लाम, एम. रेहमान, एस. इस्लाम, अल अमीन हुसेन, रूबेल हुसेन आणि हसन मेहमूद.