ऑनलाईन टीम / ढाका :
दिवसेंदिवस वाढणाऱ्या बलात्कारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी बांग्लादेश सरकारने बलात्कार प्रकरणातील दोषींना मृत्युदंडाची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच देशाचे राष्ट्रपती याबाबतचा अध्यादेश जारी करणार असल्याची माहिती बांग्लादेशचे कायदामंत्री आनीसुल हक यांनी दिली आहे.
बांग्लादेशात दरवर्षी एक हजारहून अधिक महिलांवर बलात्कार होतात. नुकतेच एका 37 वर्षीय महिलेवरील बलात्काराचे फुटेज बांग्लादेशात व्हायरल झाले. त्यामुळे देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर सोमवारी मंत्रीमंडळाने बलात्काऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याच्या निर्णयास मंंजुरी दिली.
महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आयन-ओ-सलीश सेंटर या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत बांग्लादेशात बलात्काराच्या 889 घटना घडल्या आणि 41 महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे.