कर्नाटक राज्य संयुक्त बांधकाम संघटनेची निदर्शने
बेळगाव : कोरोनाकाळात बांधकाम कामगारांना तसेच इतर कामगारांना राज्य सरकारने तीन हजार रुपये देण्याचे जाहीर केले. मात्र, ते योग्य व्यक्तीला देण्याऐवजी इतरांनाच दिले गेले आहेत. त्यामध्ये गोंधळ झाला असून योग्य व्यक्तींनाच रक्कम द्यावी. सध्याच्या महागाईमध्ये 3000 ही रक्कम काहीच नाही तर किमान 10 हजार रुपये मासिक द्यावेत, अशी मागणी कर्नाटक राज्य संयुक्त बांधकाम संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कोरोनामुळे बांधकाम तसेच इतर क्षेत्रांवर मंदीचे सावट कोसळले आहे. त्यामुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. सरकारने विशेष पॅकेज जाहीर केले. त्याचबरोबर अन्नधान्याचे किटदेखील दिले आहेत. मात्र, ते योग्य व्यक्तींना देण्याऐवजी इतरांनाच दिले गेले आहेत. यामध्ये गैरप्रकार झाला आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. बांधकाम कामगारांना थेट रक्कम द्यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. मात्र, त्यामध्ये लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे गैरप्रकार वाढला आहे, असा आरोपदेखील यावेळी करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयटकच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आले. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. राजू गाणगी यांनी आंदोलनाचे नेतृत्त्व केले.