मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण तायडेचा उपोषणाचा इशारा
प्रतिनिधी / खेड
खेड तालुक्यातील भोस्ते ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये ३ कोटी रूपयांहून अधिक रक्कम गुंतवणूक करून उभारण्यात आलेल्या इमारतीची योग्य कागदपत्रे असतानाही गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचायत बांधकाम पूर्णत्वाचा दाखल देण्यास टाळाटाळ करत आहे. ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात उपोषण छेडण्याचा इशारा मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण तायडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
भोस्ते ग्रामपंचायत हद्दीत मुंबईस्थित चौधरी नामक बांधकाम विकासकाने इमारत उभी केली. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून इमारत बांधकाम पूर्णत्वाचा दाखल मिळण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही ग्रामपंचायतीकडून दाखला देण्यास कुचराई केली जात आहे. ग्रामपंचायतीने मनमानी कारभार सुरूच ठेवल्याने कर्जबाजारी झालेल्या बांधकाम विकासकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला होता.
मात्र, याबाबतची माहिती मिळताच विकासकास आत्महत्येपासून परावृत्त करत ग्रामपंचायतीची दोन वेळा भेट घेतली. मात्र, ग्रामपंचायत दाखल न देण्याच्या भूमिकेवर अजूनही ठाम आहे. याप्रकरणी येथील तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्याकडे निवेदन सादर करून विकासकास न्याय देण्याची मागणी केली होती. त्यानुसार तहसीलदार घोरपडे यांनी गटविकास अधिकारी यांच्यामार्फत अहवाल सादर करून दाखला देण्याच्या सूचना देखील केली होती.
या आदेशाला देखील ग्रामपंचायतीने अक्षता लावल्या आहेत. १९ डिसेंबपर्यंत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला ग्रामपंचायतीने न दिल्यास उपोषण छेडणार असल्याचे तायडे यांनी निवेदनात म्हटले आहे.