वजनकाटा खरेदीसाठी अनुदान मिळणार : लाभ घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
शेतीतील आधुनिकीकरण, सुधारित तंत्रज्ञानाचा वापर, दर्जेदार रोपनिर्मिती व शासनाच्या विविध योजना यामुळे बागायत क्षेत्रात वाढ झाली आहे. शिवाय या योजना बागायतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी खात्याने विशेष प्रयत्न चालविले आहेत. बागायत क्षेत्रातील फळांच्या उत्पादनासाठी अनुदानदेखील जाहीर केले आहे.
बागायत क्षेत्रवाढीसाठी तलाव खोदाई, छत (आच्छादन), पॅकिंगसाठी बॉक्स, रॅक आणि इतर साहित्यासाठी भरघोस अनुदान दिले जात आहे. त्यामुळे बागायतदारांनी या अनुदानाच्या माध्यमातून बागायत क्षेत्र वाढवावे आणि उत्पादनात वाढ करावी, असे आवाहन बागायत खात्याने केले आहे.
जिल्हय़ात गतवषी 16238.29 हेक्टर क्षेत्रात तब्बल 344641.71 मेट्रिक टन उत्पादन झाले होते. त्यामध्ये डाळिंब, पेरू, द्राक्षे, चिकू, चिंच, सीताफळ, आंबा, काजू आदी फळांचा समावेश आहे. अलीकडे फळांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. मात्र, उत्पादित फळांच्या सुरक्षिततेसाठी आणि साठवणुकीकडे बागायतदारांचे दुर्लक्ष होते. याकरिता खात्याकडून उत्पादित माल सुरक्षित राहावा, याकरिता प्लास्टिक बॉक्स, कागदी बॉक्स, कॅरेट्स आणि रॅकच्या खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे उत्पादकांना कमी किमतीत पॅकिंगचे साहित्य खरेदी करता येणार आहे. बागायत शेती ते खरेदीदार इथपर्यंतचा फळांचा प्रवास सुरक्षित व्हावा, याकरिता बागायत खात्याने ही योजना राबविली आहे.
बागायत शेतीतील फळांचे वजन करण्यासाठी वजनकाटा खरेदी करण्यासाठीदेखील अनुदान उपलब्ध होणार आहे. उत्पादकांची फसवणूक होऊ नये आणि उत्पादित फळे शेतातच वजन करता यावीत, यासाठी बागायतदारांना अनुदानांतर्गत इलेक्ट्रिक वजन काटा खरेदी करता येणार आहे.
बागायत उत्पादनात वाढ करा
बागायत खात्यामार्फत तलाव खोदाई, छत, पॅकिंगचे साहित्य आणि वजन काटा खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जात आहे. संबंधित बागायतदारांनी याचा लाभ घेऊन बागायत उत्पादनात वाढ करावी.
– महांतेश मुरगोड (उपनिर्देशक, बागायत खाते)