वार्ताहर /उचगाव
बेळगाव-वेंगुर्ले या मार्गावरील कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीतील बाची-शिनोळी या फाटय़ावर खराब रस्त्याचा फटका बसून उसाने भरलेली ट्रक्टर ट्रॉली उलटून अपघात झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. यामध्ये ट्रक्टरचे नुकसान झाल्याची माहिती सदर ट्रक्टर मालकांनी दिली आहे. वाघवडे येथील अप्पुनाथ बुवाजी यांच्या मालकीचा हा ट्रक्टर असून बाची येथून उसाची ने-आण सुरू होती.
बेळगाव-वेंगुर्ले या मार्गावरील शिनोळी फाटा याठिकाणी दोन्ही राज्यांच्या वादामध्ये रस्त्याची दुरुस्ती कोणी करावी या वादात याठिकाणी मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. याचा परिणाम या मार्गावरून ये-जा करणाऱया अनेक लहान-मोठय़ा सर्व वाहनांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी दुपारी बाची या भागातून उसाचा ट्रक्टर हलकर्णी येथील दौलत सहकारी साखर कारखान्याकडे निघाला असताना ट्रॉली पलटी झाली. यामध्ये ट्रक्टर ट्रॉलीचे आणि उसाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आणि ट्रक्टर मालकाला मोठा फटका बसला आहे. दोन्ही राज्यांच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रारी करूनदेखील रस्त्याकडे सर्वांनीच कानाडोळा केल्याने प्रवासी वर्गाला, वाहनधारकांना याचा मोठा फटका बसत आहे. तरी तातडीने कर्नाटक अथवा महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासीवर्गातून, वाहन चालकांतून करण्यात येत आहे..