आकाशकंदील, पणत्यांचा रंगीबेरंगी प्रकार उपलब्ध : बालगोपाळ नरकासुर बनविण्यात गर्क,पावसाच्या सावटातही लोकांचा उत्साह
प्रतिनिधी /पणजी
दीपावली उत्सव केवळ दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि राज्यातील बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहे. जनतेमध्येही दिवाळी उत्सवासाठीच्या उत्साहात वाढ झाली आहे तर बालगोपाळ मंडळी या उत्सवाचे खास आकर्षण असलेल्या नरकासुर प्रतिमा बनविण्यात गर्क आहेत. पावसाने मात्र या उत्सवाच्या उत्साहावर विरजण टाकले आहे.
दीपावली उत्सवाच्या विविध परंपरांना सोमवारी गोवत्स पाडव्याने प्रारंभ झाला. आज मंगळवारी धनत्रयोदशी तर उद्या बुधवारी रात्री यमदीपदान कार्यक्रम व रात्री गोव्यात दिवाळी पूर्वसंध्येची धुमधाम सुरु होईल. उद्या रात्री गोव्यात सर्वत्र नरकासुर प्रतिमा रंगून तयार होतील. गुरुवारी पहाटे 5 वा.पासून नरकासुर प्रतिमांचे दहन सुरु होईल व त्यानंतर सकाळी 6.30 वा.च्या दरम्यान पहिले अभ्यंगस्नान होईल. सलग चार दिवस पहाटे अभ्यंगस्नान करण्याची प्रथा व परंपरा गोव्यात कित्येक वर्षांपासूनची आहे. दि. 4 रोजी सायंकाळी लक्ष्मीपूजन होईल. दिवाळीच्या या मुख्यदिनी पोहेंच्या फराळासाठी महिलावर्गाची तयारी सुरु झाली आहे. शनिवार दि. 6 रोजी ‘भाऊबीज’ सण साजरा केला जाणार आहे.
दिवाळी सणाच्या खरेदीसाठी गोव्यातील विविध बाजारपेठांमध्ये सोमवारी एकच गर्दी उसळली होती. रंगीबेरंगी आकाशकंदील, रांगोळ्य़ा, लक्ष्मीपूजनानिमित्त श्री लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती देखील अनेक कुंभारवर्गाने विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. पणजी बाजारपेठांमध्ये खानापूर तालुक्यातील अनेक पारंपरिक कुंभारमंडळी वार्षिक पद्धतीनुसार याही वर्षी मदतीच्या पणत्या, मातीचे रंगीबेरंगी दिवे, मातीचे मोठे दिवे, विविध आकाराच्या आकर्षक पणत्या असे मातीपासून बनविलेल्या अनेक वस्तू घेऊन विक्रीला बसलेले आहेत.
पोहे रु. 100 प्रतिकिलो
दिवाळीला मुख्य फराळ म्हणजे पोह्यांचा. गोव्यात मोठय़ा प्रमाणात नागरिक दिवाळीला पोहे खरेदी करतात. पोहेंशिवाय दिवाळी होऊच शकत नाही. बाजारात गावठी पोह्यांना भारी मागणी असल्याने यावर्षी गावठी पोह्यांचा दर रु. 100 ठेवला आहे. पणजी, फोंडा, मडगाव, वास्को, म्हापसा, डिचोली इत्यादी बाजारपेठांमध्ये दिवाळीनिमित्त सामान खरेदीसाठी प्रचंड गर्दी उसळलेली आढळून आली.
नरकासुर प्रतिमा भिजल्या
दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा पावसाळा सुरु झालेला आहे. दररोज दुपारनंतर पावसाचे आगमन होते. या गडबडीत नागरिक सध्या तयार करीत असलेल्या नरकासुरांच्या प्रतिमा पावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी धावपळ उडते. रविवारी अनेक ठिकाणी नरकासुर प्रतिमा भिजल्या. दरम्यान, हवामान खात्याने सायंकाळी जारी केलेल्या माहितीनुसार, दि. 5 नोव्हेंबरपर्यंत कदाचित 6 नोव्हेंबरपर्यंत देखील मुसळधार पाऊस वीजांच्या गडगडाटासह पडू शकतो. गोव्यात त्यासाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.
चिनी मालाची विक्री जवळपास बंद!
यंदाच्या दिवाळीचे खास आकर्षण म्हणजे मोठय़ा प्रमाणात चिनी पणत्या, चिनी दिवे, चिनी पद्धतीचे वीज दिवे बंदच झालेले आहेत. गोव्यातील जनतेने देखील चिनी बनावटीचे दिवे खरेदी करायचे नाहीत असे ठरविलेले असल्याने व चिनी वस्तुंच्या खरेदीवर बहुतेकांनी बहिष्कार टाकल्याने बाजारात चिनी वस्तुंची दुकानेच आता गायब झाली आणि नागरिक पुन्हा एकदा देशी पणत्या व देशी मातीच्या दिव्यांकडे वळले आहेत.