कडावल व्यापारी संघटना मेळाव्यात देणार निवेदन
वार्ताहर / कडावल:
शहराप्रमाणे आता ग्रामीण भागातील बाजारपेठांतही परप्रांतियांचा शिरकाव होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्याला विरोध दर्शविण्यासाठी येथील महापुरुष मंदिर येथे कडावल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रश्नी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी मेळाव्यात निवेदनाद्वारे लक्ष वेधणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
भविष्यात कडावल बाजारपेठेतील पारंपरिक व्यवसाय करणाऱया स्थानिक व्यापाऱयांना यामुळे आर्थिक हानी पोहचून त्यांच्या व्यवसायावर गदा येऊ शकते. तसेच आधीच कर्जबाजारी असणारा स्थानिक व्यापारी परप्रांतियांच्या शिरकावामुळे भरडला जाणार असल्याची चिंताही व्यक्त करण्यात आली. दरम्यान, या बैठकीत परप्रांतियांना विरोध करण्यासाठी ठराव करण्यात आला. ग्रा. पं. ने परप्रांतियांना व्यवसाय करण्यासाठी परवानगी देऊ नये. स्थानिक व्यावसायिकांच्या रोजगारावर भविष्यात गदा येऊ नये, असे हितावह निर्णय घ्यावेत, असे निवेदन ग्रा. पं. ला देण्यात आले.