सेन्सेक्स 187 अंकांनी वधारला ः टाटा स्टीलचे समभाग तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील दुसऱया सत्रात मंगळवारी बीएसई सेन्सेक्सचे प्रारंभीच्या कालावधीत प्रचंड नुकसान झाले तर दिवसभरातील कामगिरीनंतर अंतिम क्षणी मात्र बाजार सावरल्याचे दिसून आले. यामध्ये शेवटचे काही तास रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स आणि टायटन यासारख्या कंपन्यांच्या समभागातील लिलावाने सेन्सेक्स 187 अंकांनी तेजीत राहिल्याचे दिसून आले.
ट्रेडिंगच्या दरम्यान सौदे पूर्ण करण्यासाठी करण्यात आलेल्या लिलावामधील समभागात तेजी आली आहे. यामुळे बाजाराला नुकसानीतून बाहेर पडण्यास मदत झाली आहे. चढउताराच्या दरम्यान बीएसई सेन्सेक्स अंतिम क्षणी 187.39 अंकांनी मजबूत होत 57,808.58 वर बंद झाला आहे. याप्रकारे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 53.15 अंकांनी वधारुन 17,266.75 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक 3.10 टक्क्यांनी लाभात राहिले आहेत. यासोबतच बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेन्ट्स आणि टायटन यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला पॉवरग्रिड कॉर्प, टीसीएस, टेक महिंद्रा, एचडीएफसी लि. आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग 1.66 टक्क्यांनी घसरणीत राहिले आहेत.
पतधोरण बैठकीतील निर्णयाकडे लक्ष
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणासंदर्भातील बैठकीला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. 10 फेब्रुवारी रोजी रेपो रेटसंदर्भातला निर्णय जाहीर होणार आहे. याचे पडसाद आज व उद्या बाजारावर राहणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
आशियातील अन्य बाजारात जपानचा निक्की, चीनचा शांघाय कम्पोझिट आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी हे लाभात राहिले असून हाँगकाँगचा हँगसेंग हा घसरणीत राहिला आहे. तर युरोपियन प्रमुख बाजारात दुपारच्या दरम्यान तेजी राहिली होती.