प्रतिनिधी / काणकोण
गोवा फॉरवर्डचे पदाधिकारी आणि लोलये-पोळे पंचायतीचे माजी सरपंच मोहनदास लोलयेकर यांच्या बादेगाळ-पैंगीण येथील पूर्वापार जमिनीवरील झाडीत अत्यंत प्राचीन असे शिवलिंग आढळले आहे. लोलयेकर यांची डोंगरमाथ्यावर ही वाडवडिलांची जमीन असून या ठिकाणी कुंपण तयार करत असताना जमीन खणतेवेळी हे शिवलिंग आढळले आहे. या ठिकाणी पूर्वी एखादे शिवमंदिर असण्याची शक्यता त्यामुळे बळावली आहे. या शिवलिंगाची सफाई करून लोलयेकर यांनी ते ठेवले आहे. झाडाझुडुपात गडप झालेल्या या शिवलिंगाच्या शेजारी एक दगडी रगडा असल्याची माहिती लोलयेकर यांनी दिली. आपण सदर शिवलिंग आणि रगडा पुरातत्त्व खात्याकडे सोपविणार असून त्यानंतर त्या नेमक्या किती वर्षे जुन्या आहेत यावर प्रकाश पडण्याची शक्यता लोलयेकर यांनी व्यक्त केली.