बुधवारी 310 बाधित, 428 कोरोनामुक्त : 13 बळी, बरे होण्याचे प्रमाण 95.71 टक्के
प्रतिनिधी / पणजी
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट दिसून आली असून बाधितांपेक्षा बरे होणाऱयांची संख्या अधिक होत असल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. बुधवारी राज्यात 13 जण दगावले असून बळींची संख्या 2960 वर पोहोचली आहे. गत 24 तासात 310 नवीन बाधित सापडले तर 428 जण बरे झाले आहेत. त्यायोगे बरे होण्याचे प्रमाण 95.71 टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या सक्रिय रुग्णसंख्या 4044 एवढी खाली आली आहे.
वर्षभरातील बाधितसंख्या 163358 वर पोहोचली आाहे. आतापर्यंत एकूण 156354 जण कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारी 2588 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील 310 बाधित सापडले. त्यापैकी 42 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले तर 268 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले. त्याचबरोबर 34 जणांना गोमेकॉतून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बुधवारी बळी गेलेल्या 13 जणांसह एकूण बळींची संख्या 2960 वर पोहोचली आहे. त्यातील 11 जण गोमेकॉत दगावले. त्याशिवाय दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात एक आणि उत्तर गोव्यातील खाजगी इस्पितळात एकाचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये 32 पासून 78 वर्षे वयोगटातील 11 पुरुष आणि 2 महिला रुग्णांचा समावेश आहे.
फोंडा केंद्रात 402 रुग्ण
राज्यातील 33 पैकी फोंडा केंद्रात सध्या सर्वाधिक 402 रुग्ण उपचार घेत आहेत. त्या खालोखाल मडगावात 249, पणजीत 236 आणि चिंबलमध्ये 233 रुग्ण आहेत. सध्या सर्वात कमी 31 रुग्ण कासारवर्णेत आहेत. डिचोली, वाळपई, म्हापसा, हळदोणे, कासारवर्णे, कोलवाळ, शिवोली, मये, बाळ्ळी, चिंचिणी, धारबांदोडा व नावेली या केंद्रांत प्रत्येकी 100 पेक्षा कमी रुग्ण आहेत.
बुधवारी 15,911 जणांचे लसीकरण
राज्यात चालू असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेस बुधवारी चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसभरात 15,911 जणांचे लसीकरण करण्यात आले. त्यात 45 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील 6515 जणांनी पहिला डोस, 175 जणांनी दुसरा डोस, टीका उत्सव-2 मध्ये 4512 जणांनी पहिला डोस, 11 जणांनी दुसरा डोस तर टीका उत्सव-3 मध्ये 18 ते 44 वयोगटातील 4559 जणांनी पहिला डोस आणि 139 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.