प्रतिनिधी/ कुंकळ्ळी
बाप्सोरा-वेळ्ळी, सासष्टी येथील श्री राममंदिराचा मूर्तिप्रतिष्ठापना सोहळा 2 ते 4 फेब्रुवारीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनिशी होणार आहे, तर येथील दीपस्तंभाच्या मुख्यमंत्रा प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम रविवार 2 रोजी सायंकाळी 5.30 वा. होणार आहे. उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर तसेच जलस्रोतमंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर निमंत्रित पाहुणे म्हणून माजी खासदार नरेंद्र सावईकर व माजी आमदार बेंजामिन सिल्वा, वेळ्ळीचे सरपंच सावियो डिसिल्वा उपस्थित राहणार आहेत.
नऊ वर्षांनंतर हे मंदिर पूर्णत्वास आले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते या मंदिराचा शिलान्यास सोहळा झाला होता. साळ नदीच्या पूर्व दिशेला डोंगरावर या मंदिराचे बांधकाम झाल्याने सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. हा परिसर पाहूनच पर्रीकर खुष झाले होते. येथे विविध सोयी-सुविधा उपलब्ध केल्यास पर्यटनदृष्टय़ा आकर्षणात या मंदिराची भर पडेल, असे मत पर्रीकर यांनी त्याचवेळी व्यक्त केले होते. ही बाब त्यांनी समितीच्या लक्षातही आणून दिली होती. आजही याची आठवण काही लोक काढताना दिसतात.
या मंदिराच्या बांधकामासाठी गावकरी, अन्य नागरिक यांची सढळ हस्ते मदत लाभली आहे. विषेशता येथील महिला मंडळाने भरीव मदत केली आहे. या मंदिरात मुख्य श्री राम व श्री सीता बाजूला श्री गणपती व श्री मारूती अशा मूर्ती स्थापन करण्यात येणार आहेत. या मूर्ती सारकल-कर्नाटक येथील नित्यानंद आचार्य यांनी तयार केल्या आहेत. मंदिर व सभागृहाच्या बांधकामावर मिळून सुमारे दीड कोटी रुपये तसेच मूर्ती तयार करण्यावर दोन लाख, मंदिराच्या रंगकामावर तीन लाख तसेच जमिनीसंदर्भातील व्यवहार, जमीन सपाट करणे यावरही बरीच रक्कम खर्च झाली आहे. दीपस्तंभ बांधकामावर 6 लाख खर्च झाले आहेत. जमीन संपादित करण्यासाठी वसंत सरवणकर यांचे सहाय्य लाभले, तर एकूण मंदिराच्या बांधकामात सुरुवातीला मोठे योगदान माजी आमदार बेंजामिन सिल्वा यांचे लाभल्याचे व विद्यमान मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स यांनीही भरीव साहाय्य केल्याचे अध्यक्ष देवानंद लोणे यांनी सांगितले.
सुरुवातीला अध्यक्ष संजू तारी व इतर पदाधिकाऱयांच्या कार्यकाळात मंदिर बांधकामाला प्रारंभ करण्यात आला होता. सध्या अध्यक्ष देवानंद लोणे, सचिव संतोष खराडे, खजिनदार नितीन जुवटकर आणि महेंद्र जुवटकर, सदा जुवटकर, नंदू केरकर, स्वप्नील तारी, सोमनाथ तारी, सुहास कुमठेकर, सुभाष पेडणेकर, संतोष भोसले, रामदास जातेकर यांच्या समितीने परिश्रम घेऊन एकदाचे मंदिर पूर्णत्वास पोहोचविले आहे.
रविवार 2 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 दरम्यान यजमानास प्रायश्चित, शुद्धिकरण, मंगलाचरण, गणेशपूजन, पुण्याहवाचन, देवनांदी, मंडपप्रतिष्ठा, मातृकापूजन, सोमवार 3 रोजी सुहासिनींकडून गंगापूजन, जलाधिवास, नवग्रह, वास्तू हवन, गृहहवन, प्रतिष्ठा होम, शिखर कलश स्थापना, मंगळवार 4 रोजी देवतापूजन, दुपारी 12.30 वा. मूर्तिप्रतिष्ठापना, प्राणप्रतिष्ठा, तत्त्वन्यास होम, देवाची महापूजा, बलिदान, पूर्णाहुती, आरती, सार्वजनिक प्रार्थना व त्यानंतर 1.30 वा. महाप्रसाद होईल. भाविकांनी या सोहळ्य़ात सहभागी होऊन श्रींच्या कृपाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीने केले आहे.