आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश; स्थानिकांसह पर्यटकांमध्ये समाधान
वार्ताहर / कास
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात- आठ महिन्यांपासून बामणोली, तापोळा बोटिंगसह किल्ले वासोटा पर्यटन बंद असल्याने या भागातील दोन ते अडीच हजार व्यावसायिकांचे अतोनात नुकसान सुरु होते. व्यवसाय बंद असल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक लोकांची उपासमार सुरु होती. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर गुरूवार पासुन बामणोली, तापोळा बोटींगसह वासोटा पर्यटन पुन्हा सुरु झाले असून बामणोली, तापोळा परिसरातील व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बामणोली, तापोळा येथील बोटींग आणि वासोटा किंवा पर्यटन गेल्या सात ते आठ महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाने बंद ठेवले होते. बोटींग, पर्यटन आणि हॉटेल व्यवसाय यावर बामणोली, तापोळा परिसरातील सुमारे २ ते अडीच हजार व्यवसायिकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. सर्वत्र सर्वकाही सुरु झाले असल्याने बामणोली, तापोळा येथील बोटींग आणि वासोटा पर्यटन पुर्ववत सुरु होण्यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सोमवारी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेऊन तातडीने सुरु करण्याची मागणी करून तशा सूचना जिल्हा प्रशासनाला करण्यास सांगितले. यावेळी भैरवनाथ बोट क्लबचे पदाधिकारी आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. ना. देसाई यांनी तत्काळ सूचना केल्यानंतर दोन- तीन दिवसात बामणोली, तापोळा बोटींगसह वासोटा पर्यटन सुरु करण्याचा निर्णय झाला.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर गुरुवार पासुन बामणोली, तापोळा बोटींगसह वासोटा पर्यटन सुरु झाले असून गुरुवारी सकाळपासूनच बोटीने पर्यटक किल्ले वासोटा दर्शनाला जाण्यास सुरुवात झाली. उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असलेले बोटिंग आणि पर्यटन सुरु झाल्याने बामणोली आणि तापोळा भागातील विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसण्यास सुरुवात झाली असून परिसरातील व्यवसायिक आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.