वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर जो बायडेन पहिल्यांदाच रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा करणार आहेत. 16 जून रोजी ही भेट जीनिव्हा येथे होणार आहे. व्हाइट हाउसने मंगळवारी याची पुष्टी दिली आहे. अमेरिका आणि रशिया यांच्यात दीर्घकाळापासून अनेक मुद्दय़ांवर तणाव सुरू आहे. यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रशियाच्या गुप्तचर यंत्रणांच्या हस्तक्षेपाचा आहे. अमेरिकेच्या विदेश विभागाने रशियावर जाहीरपणे आरोप केला आहे.
दोन्ही नेत्यांच्या बैठकीत सर्व मुद्दय़ांवर चर्चा होणार आहे. रशिया आणि अमेरिकेचे संबंध सुधारावेत आणि जागतिक मुद्दय़ांवर परस्परांनी सहकार्य करावे अशी इच्छा असल्याचे उद्गार व्हाइट हाउसच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी काढले आहेत.
हवामान बदल आणि जी-20 च्या परिषदेत दोन्ही नेते व्हर्च्युअली सामील झाले होते. पण पहिल्यांदाच दोन्ही देशांचे प्रमुख समोरासमोर बसून चर्चा करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि बराक ओबामांच्या कार्यकाळात रशियासोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण यात अधिक यश मिळू शकले नव्हते.
बायडेन यांनी मागील महिन्यात पुतीन यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता. यादरम्यान यांनी समोरासमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता, जो पुतीन यांनी स्वीकारला होता. त्यानंतर दोन्ही देशांच्या विदेश मंत्र्यांची बैठक झाली होती.
रशियावर गंभीर आरोप रशिया आमच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचे अमेरिकेने अनेकदा म्हटले आहे. रशियाने अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बायडेन यांनीच डिसेंबर महिन्यात केला होता. एप्रिल महिन्यात अमेरिकेने रशियाच्या 10 मुत्सद्दय़ांना परत पाठविले होते. याच्या प्रत्युत्तरादाखल रशियाने अमेरिकेच्या 30 मुत्सद्दय़ांना देशातून बाहेर काढले होते. अमेरिकेतील तपास यंत्रणांचा डाटा हॅक करण्याचा कट रशियाने रचला होता असा आरोप आहे.