वृत्तसंस्था/ बुडापेस्ट
जर्मनीच्या बायर्न म्युनिच संघाने गुरुवारी येथे युफा सुपर चषक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्मयपद पटकाविले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात बायर्न म्युनिचने सेव्हिलाचा जादा कालावधीमध्ये 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. युरोपमधील कोव्हिड 19 काळातील पहिला असा सामना आहे, ज्यात प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. बायर्न म्युनिचचा संघ जर्मनीच्या फुटबॉल क्षेत्रात बलाढय़ समजला जातो. या संघाने 2019-20 च्या फुटबॉल हंगामात मिळविलेले हे चौथे जेतेपद आहे.
बायर्न म्युनिचला सध्या हॅन्सी फ्लिक यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालील हे चौथे जेतेपद आहे. जर्मनीत कोरोनाची समस्या निर्माण झाल्याने गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत सर्व स्थानिक फुटबॉल स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. अलीकडेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा जर्मनीत बुंदेस्लिगा स्पर्धा घेण्यात आली. गुरुवारच्या अंतिम सामन्यात बायर्न म्युनिचचा दुसरा आणि निर्णायक गोल बदली खेळाडू झेव्हि मार्टिनेझने हेडरद्वारे 104 व्या मिनिटाला नोंदविला. मार्टिनेझचा बायर्न म्युनिच संघाकडूनचा हा शेवटचा सामना होता. या सामन्यात युरोपा लिग विजेत्या सेव्हिलाने 13 व्या मिनिटाला आपले खाते उघडले. त्यांचा हा पहिला गोल पेनल्टीवर लुकास ओकँपोसने केला. 34 व्या मिनिटाला लियॉन गोरेटकाने बायर्न म्युनिचला बरोबरी साधून दिली. निर्धारित 90 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. पंचांनी जादा वेळेचा अवलंब करत हा सामना निकाली केला. बायर्न म्युनिचने अलीकडच्या कालावधीत सलग 32 सामने जिंकून आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे.