लोटे येथे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे महत्वपूर्ण विधान
प्रतिनिधी/ चिपळूण
नाणार आता गेलंच आहे, मात्र बारसू परिसरातील ग्रामपंचायतींनी रिफायनरी प्रकल्पाची मागणी केली आहे. त्यानुसार स्थानिक जनतेशी, कंपनीशी चर्चा केली जाणार आहे. प्रकल्पाबाबत स्थानिक सकारात्मक असतील तर सरकार रिफायनरीचा नक्की विचार करेल, असे महत्वपूर्ण विधान उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी लोटे येथे केले. त्याचबरोबर लोटेतील कोकाकोला प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असून नजीकच्या काळात कोकणात मोठी औद्योगिक गुंतवणूक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोटेत सीईटीपीने उभारलेल्या राज्यातील पहिल्या हवा प्रदूषण निरीक्षण यंत्रणेच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नाणारच्या लोकांनी केलेला विरोध शिवसेनेने स्वीकारला, परंतु तोच रिफायनरी प्रकल्प इतरत्र लोकांना हवा असेल तर त्याचा विचार सरकार नक्की करेल. जसे नाणारला स्थानिक जनतेचा विरोध म्हणून प्रकल्प नको तसे स्थानिक जनतेकडूनच प्रकल्पाची मागणी होऊन त्यामध्ये सकारात्मकता असेल तर त्याचा सरकार नक्की विचार करणार आहे. बारसुला एमआयडीसीने अधिसूचना काढून काही जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्या ठिकाणी रिफायनरी प्रकल्प येण्याचा निर्णय झाला तर त्या या भूसंपादनाचा फायदा होऊ शकतो. प्रकल्पांना विरोध होतो तेथे आम्ही तो लादत नाही. मात्र स्थानिक जनतेची मागणी असेल, सगळ्यांचा पाठिंबा असेल तर हा प्रकल्प होऊ शकतो, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 3 सामंजस्य करार करण्यात आले. अमेरिका, जपान, जर्मनी, सिंगापूर तसेच कोरियातील 60 कंपन्या आपल्याकडे आल्या. त्यांच्याशी वाटाघाटी सुरू आहेत. जागाही द्यायचे सुरू आहे. त्यातील काही कोकण भागात येत आहेत. कोकणची किनारपट्टी उद्योजकांना आकर्षित करत असल्याने नजीकच्या काळात कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्गसह रायगड, पालघर या जिल्हय़ात मोठी औद्योगिक गुंतवणूक होणार आहे. रायगड जिल्हय़ात आंतरराष्ट्रीय एक्स्पोर्ट, आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. या दोन आकर्षणामुळे रायगडमध्ये गुंतवणूक वाढत आहे. मात्र पुढच्या काळात कोकणातील इतर ठिकाणीही उद्योग येणार आहेत.
लोटे विस्तारित टप्प्यातील प्रस्तावित कोकाकोला प्रकल्पाबाबत ते म्हणाले की, या प्रकल्पाने यापूर्वीच येथे जमीन घेतलेली आहे. अलिकडेच आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, जमीन अधिक काळ घेऊन ठेवता येणार नाही. त्यावर त्यांनी प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरूवात करत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हा प्रकल्पही लवकरच सुरु होईल.
…