चॅम्पियन्स लीग फुटबॉल : मेस्सी व लेवान्डोवस्की यांचे चमकदार प्रदर्शन
वृत्तसंस्था/ बार्सिलोना
लायोनेल मेस्सीने केलेल्या चमकदार प्रदर्शनाच्या बळावर बार्सिलोनाने घरच्या मैदानावर झालेल्या दुसऱया टप्प्यातील सामन्यात नापोलीचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. त्यांनी दोन्ही टप्प्यात मिळून 4-2 असा विजय मिळवित चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. उपांत्यपूर्व फेरीत त्यांची लढत बायर्न म्युनिचशी होणार आहे. बायर्नने चेल्सीचा दुसऱया टप्प्यात 4-1 तर एकूण 7-1 असा धुव्वा उडवित आगेकूच केली आहे. बायर्नला यंदा तिहेरी मुकुट मिळविण्याची संधी आहे.
बार्सिलोनाने डळमळीत सुरुवात केली असली तरी दहाव्या मिनिटाला त्यांना पहिले यश मिळाले. क्लेमेंत लेन्गलेटने कॉर्नरवर हेडरद्वारे हा गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. नंतर मेस्सीने 23 व्या मिनिटाला अप्रतिम गोल नोंदवत ही आघाडी 2-0 अशी केली. चार डिफेंडरला हुलकावणी देत त्याने गोलजाळय़ाच्या कोपऱयात अचूक चेंडू मारत हा गोल केला. मेस्सीने आणखी एक गोल नोंदवला होता. पण त्याने चेंडू हाताळल्याचे व्हीएआर रिव्हय़ूमध्ये दिसून आल्याने हा गोल नाकारला गेला. मेस्सीने नंतर एक पेनल्टी मिळवित याची भरपाई केली. या पेनल्टीवर लुईस सुआरेझने संघाची आघाडी 3-0 अशी केली. पूर्वार्ध संपण्याच्या सुमारास लॉरेन्झो इनसाईनने पेनल्टी स्पॉटवर नापोलीचा एकमेव गोल नोंदवला. उत्तरार्धात नापोलीने बार्सिलोनापेक्षा सरस खेळ करीत अनेक चढाया केल्या. पण बार्सिलोनाने त्यांना गोल करण्यापासून रोखण्यात कसेबसे यश मिळविले. पुढील शुक्रवारी लिस्बन येथे बार्सिलोना व बायर्न म्युनिच यांच्यात उपांत्यपूर्व लढत होणार आहे.
बायर्नकडून चेल्सीचा धुव्वा
म्युनिच येथे झालेल्या सामन्यात रॉबर्ट लेवान्डोवस्कीच्या शानदार कामगिरीमुळे बायर्न म्युनिचने चेल्सीचा दुसऱया टप्प्यातील सामन्यात 4-1 असा धुव्वा उडविला. त्याने दोन गोल नोंदवले व दोन गोलसाठी मदत केली. पहिल्या टप्प्यात 3-0 असा विजय मिळविला असल्याने त्यांनी ही लढत 7-1 अशा फरकाने जिंकत शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले. या मोसमातील सर्व स्पर्धांत मिळून बायर्नने 18 सामने जिंकले आहेत. बायर्नने स्थानिक लीग आणि एफए कप जिंकून दुहेरी मुकुट साधला आहे. या सामन्यात 9 व्या मिनिटाला लेवान्डोवस्कीने पेनल्टीवर पहिला आणि 84 व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा गोल केला. त्याचे 44 सामन्यात 53 गोल झाले आहेत. याशिवाय इव्हान पेरिसिक व कोनेन्टिन टॉलिसो यांनी अन्य दोन गोल नोंदवले. या दोन्ही गोलसाठी लेवान्डोवस्कीने चेंडू पुरविले होते.