प्रतिनिधी / सातारा :
मोबाईलवरील पॉर्न व्हिडीओ बघून 15 वर्षीय मुलाने पाच वर्षीय बालकावर अनैसर्गिक कृत्य करुन त्याचा तोंड दाबून खून केल्याची घटना सातारा तालुक्यातील म्हसवे येथे दि. 7 रोजी सायंकाळी घडली. पोलिसांनी केवळ दोनच तासातच कृत्य करणाऱ्या संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
विघ्नेश दत्तात्रय चोपडे (वय 5, रा. म्हसवे, मुळ रा. खुटबाव, ता. माण) हा शाळेतून सुटल्यानंतर संबंधित अल्पवयीन मुलाने हे कृत्य केले असल्याची कबुली त्याने दिली असून त्या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती देताना अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे म्हणाले, काल सायंकाळी म्हसवे गावच्या हद्दीत पाच वर्षीय बालकाचा मृतदेह आढळून आल्याची तालुका पोलिसांना माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच उपविभागीय पोलीस अधीक्षक गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ हे घटनास्थळी दाखल झाले. त्या पाच वर्षाच्या मृत बालकाच्या अंगात कमरेखालची कपडे नव्हती. त्यामुळे अनैसर्गीक कृत्य झाल्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक कापरे, मोहन पवार, पो.कॉ. रोहित निकम, वैभव सांवत यांनी गावात चौकशी केली. त्याच परिसरातील 15 वर्षाचा मुलगा भेदरलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यास गोडीगुलाबीत खोदून विचारणा केली असता त्याने केलेले कृत्य कबुल केले. त्याच्या विरुद्ध मृत बालकाच्या वडिलांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.