प्रतिनिधी / कुपवाड
बालकामगार कायद्याप्रमाणे दुकाने, आस्थापना, कारखाने, सिनेमागृह, उपहारगृह, हॉटेल व गॅरेज या ठिकाणी १४ वर्षाखालील बालकांना व १४ ते १८ किशोर वयोगटातील बालकांना कामावर ठेवू नये, अशी मुले कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी केले आहे.
१२ जून हा दिवस जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ नुसार १४ वर्षाखालील बालकास सर्वच व्यवसाय व प्रक्रियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. १४ ते १८ वयोगटातील बालकास धोकादायक व्यवसाय व प्रक्रियांमध्ये कामावर ठेवणे हा फौजदारी गुन्हा आहे. फौजदारी गुन्ह्यासाठी ६ महिने ते २ वर्षांपर्यंत वाढविता येईल, इतक्या तुरूंगवासाची शिक्षा किंवा किमान २० हजार रूपये व कमाल ५० हजार रूपये इतका दंड किंवा दोन्ही शिक्षा मालकास होवू शकतात. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास किमान १ वर्ष ते ३ वर्षांपर्यंत वाढविता येईल, इतकी तुरूंगवासाची शिक्षा होवू शकते.
बालकास / किशोरवयीन बालकास कामावर ठेवल्याचे आढळल्यास कामगार आयुक्त मुंबई किंवा सहाय्यक कामगार आयुक्त सांगली या कार्यालयाशी (ईमेल : aclsangli@gmail.com, दूरध्वनी क्रमांक : ०२३३-२६७२०४६) संपर्क साधावा, असे आवाहनही गुरव यांनी केले आहे.