दड्डी यात्रेवरून परत येताना अपघाती मृत्यू : रविवारी दोघा जणांना अटक
प्रतिनिधी /बेळगाव
दोन मित्रांसमवेत मोहनगा (दड्डी) भावकेश्वरी यात्रेला गेलेल्या बाळेकुंद्री खुर्द येथील एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी यमकनमर्डी पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारी दोघा जणांना अटक करण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे.
राजू गदगय्या हिरेमठ (वय 50), संतोष काकती (वय 25) दोघेही राहणार बाळेकुंद्री खुर्द अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यमकनमर्डी पोलिसांनी खून प्रकरणाच्या चौकशीसाठी या दोघा जणांना नोटिसा पाठविल्या होत्या. पोलीस स्थानकात हजर होऊन माहिती देण्याची सूचना करण्यात आली होती.
राजू व संतोष हे दोघे यमकनमर्डी पोलीस स्थानकात हजर झाले. त्यांच्या जबानीतून संपूर्ण खून प्रकरणालाच कलाटणी मिळाली आहे. सदानंद इरय्या कुलकर्णी (वय 33) या युवकाचा खून झाला नसून अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. हे प्रकरण दडपून ठेवल्यामुळेच त्या दोघा जणांवर संशय वाढला होता. त्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उपलब्ध माहितीनुसार सदानंद हा राजू व संतोषबरोबर मोहनगा यात्रेला गेला होता. एकाच मोटारसायकलवरून ते गेले होते. यात्रा आटोपून गावी परतताना नागनूर के. एम. गतिरोधकावरून तिघेही मोटारसायकलवरून पडले. राजू व संतोष किरकोळ जखमी झाले. सदानंदच्या डोक्मयाला जबर मार बसल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे घाबरलेल्या राजू व संतोष यांनी आता हे प्रकरण आपल्याला शेकणार म्हणून त्याचा मृतदेह उसाच्या मळय़ात टाकला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला आहे.