देवरूख-आंगवलीजवळची घटना -शोधमोहिमेनंतर दोघांचे मृतदेह हाती
प्रतिनिधी/ देवरुख
संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर मार्गावरील आंगवली येथे बावनदीवर पोहायला गेलेले दोघेजण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. मोठय़ा शोधकार्यानंतर दोघांचे मृतदेह शोधण्यात रविवारी यश आले. सुजय अनिल घोगले (24), अमित अनिल माईन (22, दोघेही रा. हातीव गावकरवाडी) अशी मृतांची नावे आहेत.
या बाबत देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सुजय आणि अमित हे दोघेही शनिवारी दुपारी 12 वाजता मोटारसायकल घेऊन बाहेर निघून गेले. यानंतर ते सायंकाळपर्यंत परत न आल्याने त्यांचा शोध सुरु झाला. यावेळी काहींनी ते पोहायला गेले असतील, अशा बेताने त्यांचा शोध सुरु केला. यानुसार आंगवली बावनदी पात्रातील विठाबाई-कासारकोळवण पुलाजवळ नदीशेजारी त्यांची मोटारसायकल व काही वस्तू दिसून आल्याने नदीत शोधमोहीम सुरु करण्यात आली. रविवारी सकाळपर्यंत त्यांचा काहीही पत्ता न लागल्याने याची माहिती देवरुख पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी गाठले. यानंतर मासे पकडणाऱया घोरपी बांधवांना शोधासाठी पाचारण करण्यात आले. या बांधवांना पहिला मृतदेह शोधण्यात रविवारी सकाळी 11.30 वाजता यश आले.
याचवेळी देवरुखमधील राजू काकडे हेल्प ऍपॅडमीचे गणेश जंगम, अण्णा बेर्डे, राजा गायकवाड, दिलीप गुरव, चंद्रकांत भोसले, विशाल तळेकर, सिद्धू वेल्हाळ, निरंजन बेर्डे, प्रवीण परकर, वरद जंगम, पराग लिंबूकर, दीपक गेल्ये आदी घटनास्थळी पोहोचले. त्यांनीही शोधकार्य सुरु केले. दुपारी दीडच्या दरम्यान दुसरा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. यावेळी हातीव आणि कासारकोळवण गावातील ग्रामस्थांनी शोधकार्यात मोठी मदत केली.
मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांचे शवविच्छेदन संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावकरवाडीवर शोककळा पसरली आहे. याची नोंद देवरुख पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास हे.कॉ. व्ही. डी. मावळणकर हे करत आहेत.
दोघांची स्वप्न राहिली अधुरी
यातील अमित माईन याचा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स झाला होता. तो मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये कामाला होता. सध्या लॉकडाऊनमुळे तो गावी आला होता. या क्षेत्रात त्याला नाव कमवायचे होते. तर सुजय हा कामासाठी दोन दिवसांनी मुंबईत जाणार होता. मोठी नोकरी करून तो ही आपल्या कुटुंबाची स्वप्न पूर्ण करणार होता. आजच्या घटनेने या दोघांची स्वप्न अपुरी राहिली आहेत.
त्यांचे दोन भाऊही पोहायला जाणार होते
आजच्या घटनेत मृत झालेले दोघे आणि त्यांचे दोन भाऊही त्यांच्यासोबत पोहायला जाणार होते. मात्र या दोघांना घाई लागल्याने ते पुढे निघून गेले. ही घटना घडल्यानंतर काही वेळातच ते दोघे भाऊ तिथे पोहोचले मात्र, फक्त मोटारसायकल दिसत होती. अमित आणि सुजयचा पत्ता नसल्याने त्यांना संशय आला. याची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली. त्यानंतर शोधमोहीम सुरु झाली.