प्रतिनिधी / सरवडे
गारगोटी-कोल्हापूर मार्गावर मुधाळतिट्टा ते बिद्री दरम्यान बोरवडे गावच्या हद्दीत आज दुपारी तीन वाजता ऊसाने भरलेला ट्रॅक्टर व त्याला जोडलेल्या दोन छकडा गाडी उलटल्याने अपघात झाला. प्रसंगावधान राखून चालकाने उडी मारल्याने तो बचावला मात्र ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी छकडा गाडीतील ऊस मुख्य रस्त्यावर पडल्याने वाहतूकीची कोंडी निर्माण झाली होती.
याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, मुरगूड येथील जगद्गुरु सदाशिव गोरुले यांच्या मालकीचा ट्रॅक्टर (क्र. एमएच ०९ एफबी ३८६३) घेऊन चालक प्रविण तानाजी गोरुले (रा. मुरगूड) हा बिद्री कारखान्याकडे ऊस घेऊन चालला होता. मुधाळ तिट्टा ते बिद्री दरम्यान असलेल्या उतारावरुन जात असताना ट्रॅक्टर-ट्रॉलीचा हुक तुटल्याने दोन्ही छकडा गाडी जाग्यावरच पलटी झाल्या.
यावेळी छकड्यातील ऊस रस्त्यावर विस्कटून पडला होता, तर ट्रॅक्टर रस्त्यावरुन खाली पाच ते सहा फूट चरीत जाऊन अडकला होता. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखून वेळीच उडी मारल्याने पुढील अनर्थ टळला. या अपघातात ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. छकडा गाडीतील ऊस मुख्य रस्त्यावर विस्कटून पडल्याने काही काळ वाहतूकीची कोंडी निर्माण झाली होती. रस्त्यावरील ऊस बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.