शिराळा / वार्ताहर
उपवळे (ता. शिराळा) परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. तर गव्यांचे हि दर्शन झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर सोमवारी रात्री संकेत सुनिल पाटील यांच्या शेतामधील शेडवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात १० शेळ्या ठार झाल्या तर तीन शेळ्या गायब झाल्या असून सात कोंबड्या ठार झाल्या आहेत.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, उपवळे परिसरात गेल्या दोन दिवसापासून बिबट्याचा वावर परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांना दिसून येत आहे. या हल्ल्यापूर्वी शुक्रवारी बिबट्याने उपवळे गावातील जवळपास ४० देशी कोंबड्या या बिबट्याने फस्त केल्याची चर्चा सुरू आहे. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास या बिबट्याने संकेत पाटील यांच्या शेतामध्ये असणाऱ्या बंदिस्त गोठ्यामध्ये हल्ला करून या गोठ्या मध्ये असणाऱ्या सात मादी जातीच्या शेळ्या तर तीन नर असे १० भोर जातीच्या शेळ्या ठार केल्याचे दिसून येत आहे. या वेळी झालेल्या झटापटीत ४ मोठ्या शेळ्या बिबट्याने गायब केल्या असल्याची माहिती शेतकरी संकेत पाटील यांनी दिली असून चार कोंबडे व तीन कोंबड्या हि बिबट्याने फस्त केल्या आहेत.
जनावरांच्या शेडमध्ये सात फुटावर लावलेल्या जाळीच्या वरून बिबट्याने येऊन हा हल्ला केला आहे. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. या हल्यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. तर वनपाल चंद्रकांत देशमुख वनरक्षक हनुमंत पाटील आदी उपस्थित होते. तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभांगी अरगडे यांनी मृत शेळ्यांची तपासणी करून शवविच्छेदन केले.